राहुरी : तालुक्यातील सर्वात मोठ्या वांबोरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते ऍड. सुभाष पाटील विरुद्ध राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गटामध्ये चुरशीची लढत होणार आहे. सतरा सदस्यांसाठी 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विकासाच्या मुद्यावर दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. तालुक्यात वांबोरीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
सत्ताधारी पाटील गटाचे नेतृत्व तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, भानुदास कुसमुडे, फिरोज शेख करीत आहेत. विरोधी राज्यमंत्री तनपुरे गटाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना, किसन जवरे, एकनाथ ढवळे, गोरक्षनाथ वेताळ, ऍड. ऋषिकेश मोरे, बापूसाहेब मुथा करीत आहेत.
वांबोरी ग्रामपंचायतीची सत्ता सन 2005 पंचवार्षिक वगळता तब्बल चाळीस वर्षापासून ऍड. पाटील गटाच्या ताब्यात आहे. मागील पाच वर्षात भूमिगत गटार योजनेचे 80 टक्के काम पूर्ण केले. रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले. पिण्याच्या पाणी योजनेच्या अंतर्गत जलवाहिनीची कामे पूर्ण केली. आगामी पंचवार्षिकमध्ये थेट मुळा धरणातून सात कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी गट निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी सज्ज झाला आहे.
विरोधी तनपुरे गटाने सत्ताधारी गटाच्या उणिवांवर व राज्यमंत्री तनपुरे यांच्या माध्यमातून विकास कामांवर जोर दिला आहे. वांबोरी पाणी योजनेद्वारे चार-पाच दिवसाआड पाणी मिळते. वाड्या वस्त्यांवर पाणी मिळत नाही. मुळा धरणातील पाणी योजना कार्यान्वित करून, वाड्या-वस्त्यांसह दररोज पाणीपुरवठा केला जाईल. अंतर्गत जलवाहिन्यामुळे उखडलेले रस्ते पूर्ववत दुरुस्ती करून, रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील. कन्या शाळेत वरिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर नर्सिंग कॉलेज म्हणून शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार आहे.
दोन्ही गटांनी तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. सत्ताधारी पाटील गटाची ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी, तर विरोधी तनपुरे गटाची सत्ता परिवर्तनासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे वांबोरीची निवडणूक सर्वाधिक चर्चेची व लक्षवेधी ठरणार आहे. या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.
Edited By- Murlidhar karale

