नगर : गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीची प्रतीक्षा होती. ती आता संपली असून, नगरमध्ये आज कोरोनाची लस दाखल झाली आहे. शनिवारी (ता. 16) ही लस प्रारंभी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
कोरोनाविरुद्धच्या सीरम इनस्टट्यूटच्या कोशिल्ड लसीचे 39 हजार 290 डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकामार्फत वितरण होणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.
ही लस जिल्ह्यातील 31 हजार 196 लाभार्थिंना देण्यात येणार आहे. उर्वरीत लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 9 लाख 63 हजार डोस उपलब्ध झाले असून, त्याचे जिल्ह्यानिहाय वाटप करण्यात आले आहे.
राज्य कुटुंब कल्याण केंद्राच्या पुणे येथील कार्यालयामार्फत जिल्ह्याला हे डोस देण्यात आले. जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुणे येथून वाहनामध्ये ते नगरला आणले. आज पहाटे 3.30 वाजता ते जिल्हा परिषदेच्या शीतगृह कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यासाठी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेने खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना ही लस प्राधान्यक्रमाने दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांतील आरोग्य कर्मचाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पोर्टलवर संबंधितांच्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे.

