मतदानाचा निकाल सरपंचाच्या विरोधात ! म्हैसगावचा पदभार उपसरपंचाकडे

सरपंचपदाचे अधिकार उपसरपंच सागर दुधाट यांच्याकडे सोपविले. ग्रामसभेच्या सर्वोच्च अधिकाराचा वापर झाल्यानेया निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.
मतदानाचा निकाल सरपंचाच्या विरोधात ! म्हैसगावचा पदभार उपसरपंचाकडे
rahuri.png

राहुरी : म्हैसगाव येथे आज लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर विशेष ग्रामसभा झाली. एकूण 2 हजार 277 पैकी 1 हजार 479 (67.22 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. अविश्वास प्रस्ताव 116 मताधिक्याने मंजूर झाला. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच गागरे आज पदावरून पायउतार झाले.

तसे तहसीलदारांनी घोषित करुन, सरपंचपदाचे अधिकार उपसरपंच सागर दुधाट यांच्याकडे सोपविले. ग्रामसभेच्या सर्वोच्च अधिकाराचा वापर झाल्याने या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.

म्हैसगाव येथे जिल्हा परिषद शाळेत आज सकाळी नऊ वाजता तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली. गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके उपस्थित होते. 

म्हैसगावच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभेला अलोट गर्दी झाली. तहसीलदार शेख यांनी ग्रामस्थांना मतदान प्रक्रिया व मतपत्रिकेची माहिती सांगितली. ग्रामपंचायत सदस्यांनी 23 ऑक्टोबर रोजी सरपंच गागरे यांच्याविरुद्ध सहा विरुद्ध दोन बहूमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, थेट जनतेतून सरपंच निवड झालेली असल्याने, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज ग्रामसभेत अविश्वास प्रस्तावावर गुप्त मतदान प्रक्रिया घेण्यात आली. 

सकाळी साडेदहा वाजता मतदानाला सुरुवात झाली. शाळेतील खोल्यांमध्ये चार मतदान केंद्र होते. मतदान केंद्रासमोर मतदारांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. महिला, वृद्ध व अपंग मतदारांनी उत्साहात मतदान केले. मतपत्रिकेवर चिन्ह नसल्याने, निरक्षर मतदार गोंधळले. त्यांनी दिसेल त्या चौकोनात शिक्का मारला. काहींनी मतपत्रिकेच्या मागील बाजूस शिक्के मारले. काही मतपत्रिका कोर्‍या निघाल्या. त्यामुळे, बाद मतांची संख्या वाढली.

दुपारी तीन वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी सव्वासहा वाजता संपली. सरपंचावरील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 756 तर, प्रस्तावाच्या विरुद्ध 640 मतदारांनी कौल दिला. 83 मते बाद झाली. प्रस्तावाच्या बाजूने 116 मताधिक्य मिळाले. तहसीलदार शेख यांनी निकाल जाहीर करून, सरपंच गागरे यांचे पद रद्दबादल झाल्याचे घोषित केले.

"कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्यांमधून नवीन सरपंच निवड होईपर्यंत सरपंच पदाचे अधिकार उपसरपंच सागर दुधाट यांच्याकडे गेले आहे." असेही त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेसाठी महसूलचे 15 कर्मचारी व बंदोबस्तासाठी 20 पोलीस कर्मचारी तैनात होते. 

या मतदानाकडे महाराष्ट्रातील सरपंचांचे लक्ष लागले होते.

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in