निघोजमधील दारूबंदी उठविणाऱ्यांना मतदानातून महिला दाखविणार "हिसका'  - Voters in Nighoj to show 'jerk' in polls | Politics Marathi News - Sarkarnama

निघोजमधील दारूबंदी उठविणाऱ्यांना मतदानातून महिला दाखविणार "हिसका' 

मार्तंड बुचुडे
शनिवार, 9 जानेवारी 2021

एका प्रभागात उमेदवारी करीत असलेल्यांनी यापूर्वी गावात दारूविक्री पुन्हा सुरू केल्याने, संबंधित उमेदवार निवडून येऊन नयेत, यासाठी महिला प्रचार करणार आहेत.

पारनेर : निघोज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दारूबंदीविरोधी महिला आघाडी निवडणूक लढविणार होती; मात्र पुरुषांच्या वर्चस्वापुढे त्यांना हार पत्करावी लागली. एका प्रभागात उमेदवारी करीत असलेल्यांनी यापूर्वी गावात दारूविक्री पुन्हा सुरू केल्याने, संबंधित उमेदवार निवडून येऊन नयेत, यासाठी महिला प्रचार करणार आहेत. 

निघोज ग्रामपंचायत तालुक्‍यातील सर्वांत मोठी ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावची मतदारसंख्या सुमारे 10 हजारांच्या आसपास आहे. येथे ग्रामपंचायतीचे 17 सदस्य आहेत. या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये दोन व प्रभाग दोनमध्ये एक, अशा तीन जागांवर तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता 14 जागांसाठी 38 उमेदवार नशीब अजमावत आहेत. यातील प्रभाग तीन वगळता बहुतेक ठिकाणी दोनपेक्षा अधिक उमेदवारांमध्ये लढत होत आहे. 

निघोज येथे सुमारे दोन वर्षांपूर्वी महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदी केली. त्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला होता. ग्रामसभेच्या ठरावापासून दारूबंदीविरोधी ठरावासाठी मतदानही झाले. या दोन्ही ठिकाणी महिलांना यश आले व गावात दारूबंदी झाली. 
गावात दारूबंदी झाली खरी; मात्र ती अनेकांना खटकत होती. एक वर्षानंतर गावातीलच काही मडळींनी "गावात अनधिकृत दारूविक्री होत आहे, दारूविक्री बंद झाल्याने गावातील व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे, गावातील अनेक जण शेजारच्या गावातून दारू पिऊन येतात,' अशी कारणे देत गावातील ग्रामसभेत पुन्हा दारूविक्री सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधितांच्या वतीने तसा ठरावही ग्रामसभेत मांडण्यात आला. शेवटी तो मंजूरही झाला आणि बहुमताने बंद झालेली दारूविक्री पुन्हा एकदा गावात सुरू झाली. 

दरम्यान, ज्यांनी पुन्हा दारूविक्री सुरू केली, त्या उमेदवारांच्या विरोधात संबंधित महिलांनी एकत्र येत प्रचार करण्याचे ठरविले आहे. दरम्यान, या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ज्यांनी दारूबंदीचा ठराव मांडला व ज्या लोकांनी दारूविक्री पुन्हा सुरू होण्यासाठी जबाब दिले, त्या लोकांच्या विरोधात "नोटा'चा प्रचार करणार आहोत. त्यासाठी पत्रके, छोट्या चित्रफितींचा वापर करणार आहोत, असे दारुबंदी महिला आघाडीप्रमुख कांता लंके यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख