मतदारांना वाटल्या साड्या ! राळेगणसिद्धी येथे आचार संहितेचा भंग - Voters felt sari! Violation of code of conduct at Ralegan Siddhi | Politics Marathi News - Sarkarnama

मतदारांना वाटल्या साड्या ! राळेगणसिद्धी येथे आचार संहितेचा भंग

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 14 जानेवारी 2021

राळेगणसिद्धी येथे सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारूती पठारे यांना मतदारांना साडया वाटताना भरारी पथकाने पकडले. दोघांनाही तहसिलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करण्यात आल्यानंतर देवरे यांनी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पारनेर : तालुक्यात उद्या (ता. 15) होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभुमिवर राळेगणसिद्धी येथे मतदारांना साड्या वटाप करताना दोघांना भरारी पथकाचे अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी पकडले. त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्य़ात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आज सायंकाळी साडेसहा वजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धी येथे सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारूती पठारे यांना मतदारांना साडया वाटताना भरारी पथकाने पकडले. दोघांनाही तहसिलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करण्यात आल्यानंतर देवरे यांनी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भरारी पथकाचे अधिकारी बुगे यांच्या फिर्यादीनुसार या दोघांविरोधात पारनेर पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव एकत्रीत ग्रामस्थांच्यावतीने ठेवण्यात आला होता. गावातील परंपरागत विरोधक असलेले जयसिंग मापारी व लाभेश औटी यांनी आपल्यातील राजकिय विरोध बाजूला ठेऊन गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले होते. त्यासाठी नांवेही निश्चित केली होती. त्या नावावर व बिनविरोध निवडणुकीवरही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धीत झालेल्या बैठकीत मान्यताही देण्यात आली होती. 

मात्र काही तरूणांनी व राजकिय विरोधकांनी ठराविक लोकांनी बिनविरोध निवडणुकीचा  व सदस्यांची नांवे निवडण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे, आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा प्रचार गावात करीत बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच आम्हाला विश्वासात घेतले नाही, ही तक्रार हजारे यांच्याकडेही केली, त्यावेळी हजारे यांनी तुम्हाला मान्य नसेल, तर लोकशाही मार्गाने तसेच शांततेच निवडणुकीला कुठलेही गालबोट लागणार नाही, या पद्धीने निवडणूक करा, असा सल्ला दिला होता.

कालपर्यंत अतिशय शांततेत प्रचार करीत असलेल्या आदर्शगाव राळेगणसिद्धीतच आजा मात्र साड्या वाटताना सुरेश पठारे व किसन पठारे या दोघांना 136 साड्या व एक चारचाकी गाडीसह बुगे यांनी पकडले. यांच्यासोबत महिला सुद्धा होत्या. मात्र त्यांना ताब्यात घेतले नाही, असेही समजते. 

दरम्यान, याबाबत महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख