नगर, ता. 13 ः ``राज्यमंत्री विश्वजीत कदम जरी प्रस्थापित कुटुंबातून पुढे येऊन राजकारण करत असला तरी त्याचा काम करण्याचा प्रामाणिकपणा, मेहनत आणि विनम्रता या जोरावर लोक त्याच्यावर विलक्षण प्रेम करतील. अशी मला खात्री आहे. कॉंग्रेस आणि महाराष्ट्राच्या भविष्याला अर्थात डॉक्टर विश्वजीत कदम यांना अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद!,`` अशा शब्दांत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.
थोरात यांनी म्हटले आहे, की काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय पतंगराव कदम आपल्यातून जाऊन दोन वर्षे झाली. पतंगराव कदम आणि माझा कौटुंबिक स्नेह! पतंगराव कदम साहेब मला ज्येष्ठ होते, मात्र आमच्यात जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. आम्ही एकमेकांची चेष्टा करायचो, रागावायचो, कधी कधी चिडायचोही. आमचा हा नात्यातला गोडवा अखेरपर्यंत टिकला. आज विश्वजीत पतंगरावांचा वारसा सक्षमपणे चालवताना बघतो, तेव्हा मला सर्वाधिक समाधान आणि आनंद होतो.
पतगरावांच्या घरी गेलो की विश्वजीत तेथे असायचा. अत्यंत शांत स्वभावाचा आणि मोजकेच बोलणारा आणि विनम्र विश्वजीत बघितल्यावर मला काळजी वाटून जायची, इतका शांत विश्वजीत हा भलामोठा गाडा कसा हाकणार ? आज तो भारती विद्यापीठ, राजकारण, कुटुंबजीवन आणि सामाजिक कार्य सर्व बाबतीत अत्यंत चांगले काम करतोय..! हे सुखावणारे आहे.
मला कायमच विश्वजीत बद्दल एक आपुलकीची भावना राहिली, कदाचित ती आमच्या कौटुंबिक स्नेहामुळे असेल, मात्र त्याने आज त्याच्या काम आणि स्वभावातून माझ्यासारख्या ज्येष्ठांना जिंकलय, हे मान्यच करावे लागेल.
युवक कॉॅंग्रेसच्या माध्यमातून विश्वजीत ने महाराष्ट्राच्या युवक वर्गात स्थान निर्माण केले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आणि बहुसंख्य गावांत त्याने कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले. अनेक सामान्य कुटुंबातील युवकांना नेता म्हणून प्रस्थापित केले. अनेकांना संधी दिली. कायम जुळवून घेण्याचे, बेरजेचे राजकारण त्याने केले.
विश्वजितची काही स्वभाववैशिष्ट्य, कौशल्य कायम पतंगरावांची आठवण करून देतात. चिवटपणा, हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचे झपाटलेपण, विनम्रता, सभ्यता कितीतरी वेळा मी त्याच्यात हे गुण बघतो. समजा विश्वजितने काही काम सांगितले, तर ते पूर्ण होईपर्यंत तो कायम त्याचा पाठपुरावा करत राहतो. नेमकी हीच गोष्ट पतंगराव यांच्यात आम्ही कायम बघितली. भारती विद्यापीठाचे विश्व, राजकारणातली उंची याच पाठपुराव्याच्या जोरावर त्यांनी गाठली. लोकांच्या प्रश्नांसाठी झटणारे पतंगराव त्यामुळेच लोकांचे हृदयसम्राट होते. आज विश्वजितची लोकांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ बघतो तेव्हा समाधान वाटते.
पतंगराव कदम यांच्या अकाली जाण्यामुळे कमी वयात विश्वजीतला सारा भार खांद्यावर घ्यावा लागला. संस्था चालवणे सोपे नसते, दररोज नवे प्रश्न, नवे वाद असतात, तेव्हा अत्यंत संयमाने त्यांना सामोरे जायचे असते. आज कोणतीही कुरकुर न करता तो काम करतोय.
खरंतर विश्वजीत साऱ्याच अर्थाने समृद्ध वातावरणात राहत होता. मात्र जेव्हा जबाबदारी खांद्यावर आली, तेव्हा आपल्या वडिलांप्रमाणे गरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हेच जीवनाचे ध्येय त्याने ठरविले.
कोल्हापूर-सांगलीच्या पुरात विश्वजीतने केलेले मदतकार्य महाराष्ट्राला दिशा देऊन गेले. पुराच्या स्थितीत ता बहात्तर तास सतत जागा होता. बारा दिवस सतत पाण्यात होता. लोकांना धीर देत होता, मोडलेले आणि वाहून गेलेले संसार सावरत होता. मी पुरस्थितीचा आढावा घ्यायला गेलो तर त्याच अवस्थेत तो मला भेटला, तेव्हा मनापासून त्याचे कौतुक वाटले. पतंगरावही त्याच्या कामाने आनंदित झाले असतील. तो मला भेटायला आला तर तेव्हा पायाला पट्टी केलेली होती. पाण्यामुळे जखमा आणि इन्फेक्शन झाले होते. तरीही त्या अवस्थेत तो मदतकार्य करत होता.
आता तो मंत्री आहे मात्र अजूनही तो कोल्हापूर सांगलीच्या पुराच्या विषयाचा पाठपुरावा करतोच आहे. अतिरिक्त मदत, लाईफ बोटींची अधिकची व्यवस्था, अलमट्टी धरणातील पाणी साठ्याबाबत कर्नाटक सोबत समन्वय कितीतरी विषय तो सोडवतोय.
मंत्री म्हणून त्याने वर्षभरात चुणूक दाखवलीच आहे, मात्र तो या संधीचे नक्की सोने करेल याचा मला विश्वास आहे. राज्यमंत्री म्हणून काम करतांना काही मर्यादा असतात मात्र तरीही तो कृषि, सहकार सार्वजनिक वितरण या विभागात उल्लेखनीय काम करतोय.
कॉंग्रेसच्या वाट्याला 11 पालकमंत्री पदे आली. आमचे माझ्यासकट 12 मंत्री होते, तेव्हा विश्वजीतला कामाची संधी मिळावी ही भावना माझी होती. त्यामुळे मी पालकमंत्री नाकारले. आज विश्वजीत त्या जबाबदरीतही चांगले काम करतोय. सांगली ते भंडारा म्हणजे महाराष्ट्राची दोन टोके तरीही तो प्रशासनावर वचक ठेऊन आहे. भंडाऱ्यात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेतही तो सर्वप्रथम भंडारा जिल्हा रुग्णालयात पोहोचला.
आणखी एका बाबतीत मला विश्वजितचे विशेष कौतुक केले पाहिजे, ते म्हणजे त्याच्या कॉंग्रेसबद्दलच्या निष्ठेचे. तो महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमध्ये माझा सहकारी म्हणून काम करतो, राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून तो जबाबदारी सांभाळतोय. आजही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी तो तत्पर असतो. त्याला दिलेली संघटनात्मक जबाबदारी विनातक्रार सांभाळतो.
कोरोनाच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या निवारा आणि प्रवासाची सोय करा अशी सूचना आदरणीय सोनियाजी गांधी यांनी कॉंग्रेसजणांना केले होते. महाराष्ट्र कॉंग्रेसाने या आवाहनाला प्रतिसाद देत 30 हजार मजुरांच्या प्रवासाचा खर्च केला. विश्वजीतने बिहार, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील मजुरांसाठी स्वतंत्र रेल्वेची बुकिंग केली.
विश्वजीत जरी प्रस्थापित कुटुंबातून पुढे येऊन राजकारण करत असला तरी त्याचा काम करण्याचा प्रामाणिकपणा, मेहनत आणि विनम्रता या जोरावर लोक त्याच्यावर विलक्षण प्रेम करतील अशी मला खात्री आहे. कॉंग्रेस आणि महाराष्ट्राच्या भविष्याला अर्थात डॉक्टर विश्वजीत यांना अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद!
Edited By - Murlidhar Karale

