सासु-सुनेच्या हाती गावकी ! येथेही सासुबाईंचाच तोरा ! त्या सरपंच, सून उपसरपंच - Village in the hands of mother-in-law and daughter-in-law! | Politics Marathi News - Sarkarnama

सासु-सुनेच्या हाती गावकी ! येथेही सासुबाईंचाच तोरा ! त्या सरपंच, सून उपसरपंच

वसंत सानप
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

काही गावांत अशा पद्धतीने घरातीलच व्यक्तींमध्ये लढती झाल्या आहेत. सासु-सुनेच्या हाती सत्ता येण्याचे मात्र हे उदाहरण महाराष्ट्रात एकमेव असावे. 

जामखेड : तालुक्‍यातील 24 सरपंच-उपसरपंचाच्या निवडी आज झाल्या. विशेषत: मोहा येथे सासू सारिका डोंगरे यांची सरपंचपदी, तर त्यांच्या सूनबाई स्वाती डोंगरे यांची उपसरपंचपदी निवड झाली. 

दरम्यान, काही गावांत अशा पद्धतीने घरातीलच व्यक्तींमध्ये लढती झाल्या आहेत. सासु-सुनेच्या हाती सत्ता येण्याचे मात्र हे उदाहरण महाराष्ट्रात एकमेव असावे. 

मोहा ग्रामपंचायतीत शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नऊ पैकी आठ जागा मिळविल्या आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील सासू-सूना व दुसऱ्या एका कुटुंबातील पती भिमा कामसे व त्यांच्मा सौभाग्यवती निवडून आल्या आहेत.

सरपंचपद नागरिकाच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित होते. त्यामुळे मागील पाच वर्षे सरपंचपदाची धुरा सांभाळणाऱ्या व गावच्या हिताचे धडाडीने निर्णय घेणाऱ्या सारीका शिवाजी डोंगरे यांचीच पुन्हा सरपंचपदी निवड करण्याचा निर्धार विजयी झालेल्या आठही सदस्यांनी केला.

त्यांना गावच्या कारभारात साथ देण्यासाठी उपसरपंचपद ही त्यांच्या स्नुषा स्वाती वामन डोंगरे यांनाच देण्याचा एकमुखी निर्णय घेऊन गावचा कारभार एकमुखी आणि एकहाती देऊन ग्रामपंचायत समन्वयाने चालविणे सोयीचे ठरेल, अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली.

सरपंच, उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या आहेत. निवडीनंतर शिवाजीराव डोंगरे म्हणाले, की ग्रामस्थांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू,गावच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेऊ."

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख