विखे - थोरात संघर्ष मोठा, तरीही खासदार विखे हे थोरातांना मुलासारखेच ! - Vikhe - Thorat struggle, still Thoratan MP Vikhe is like a boy! | Politics Marathi News - Sarkarnama

विखे - थोरात संघर्ष मोठा, तरीही खासदार विखे हे थोरातांना मुलासारखेच !

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 31 जुलै 2020

थोरात-विखे वाद मिटवावा, असे मला कायम वाटते. परंतु त्यात अद्याप म्हणावे असे यश आले नाही, असे खासदार विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

नगर : भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रूत आहे. हा वाद दोन्ही नेत्यांमध्ये असला, तरी विखे पाटील यांचे पूत्र खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी मात्र याबाबत एक गाैप्यस्फोट केला आहे. ``तू मुलासारखा आहेस, असे म्हणून मला थोरात अत्यंत सन्मानाची वागणूक देतात,`` असे सांगताना खासदार विखे पाटील यांनी थोरात यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. या वादाचा गैरफायदा घेत यापुढे कोणाचेही बंगले होणार नाहीत किंवा गाड्या होणार नाही, असे सांगून त्यांनी जिल्ह्यातील काही नेत्यांना चिमटा घेतला आहे.

खासदार विखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून थोरात-विखे वादाबाबत भाष्य केले. थोरात-विखे वाद मिटवावा, असे मला कायम वाटते. परंतु त्यात अद्याप म्हणावे असे यश आले नाही, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

थोरात-विखे यांच्यात लक्ष्मण रेषा हवी

थोरात व विखे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. यापूर्वी दोघेही काॅंग्रेसमध्ये होते. त्या वेळीही अंतर्गत कलह सुरूच होता. थोरात यांचा संगमनेर व विखे पाटील यांचा शिर्डी मतदारसंघ हे दोन्हीही जवळ-जवळ आहेत. दोन्ही तालुक्यातील गावे एकमेकांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते दोन्हीही तालुक्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. आता तर थोरात काॅंग्रेसमध्ये, तर विखे पाटील भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आरोप करण्यास आणखी सोपे झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार विखे पाटील यांनी अत्यंत समर्पक शब्दांत भाष्य केले. हा वाद मिटावा, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

डाॅ. विखे म्हणाले, की या दोन नेत्यांमधील संघर्षात अऩेकांच्या चुली पेटल्या. बंगले झाले. गाड्या झाल्या. परंतु थोरात आदरणीय आहेत. मीही त्यांना आवडतो, असे त्यांचे म्हणणे आहे. एकदा विमानात सुदैवाने सीट जवळ आल्यामुळे आमचे दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल झाले. त्याचे अनेकांनी वेगवेगळे अर्थ लावून घेतले. मी त्यांच्याकडे कधीही गेलो, तरी मला सन्मानाची वागणूक मिळते. त्यांचा व्यक्तीगत अनुभव असा की, आईला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याबाबत मी त्यांच्याकडे गेलो होते. त्या वेळी त्यांनी या कामी मला मंजुरी दिली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे. ते कोण करते, हे सांगता येणार नाही, परंतु असे होऊ नये, असे वाटते. म्हणजे हे भोकाडी दाखवण्याचे काम झाले. विखेंकडून काही पाहिजे असल्यास थोरातांची भोकाडी दाखवायची. आणि थोरातांकडून काही हवे असल्यास विखेंची भोकाडी दाखवायची. यातूनही काही साध्य नाही झाले, तर पवारांची भोकाडी दाखवायची. पण मी कोणाच्याच भोकाडीला खात नाही. संघर्ष आहे, त्यांनी आरोप-प्रत्यारोप केले, तर पक्षाच्या नात्याने एकमेकांना उत्तर दिले पाहिजे. विरोध हा पक्षाच्या तत्त्वावर रहावा. वैयक्तिक नको. माध्यमांना केवळ मनोरंजनाचे साधन होऊ नये. पक्षीय पातळीवर एकमेकांवर आरोप व्हावेत, परंतु दोन्ही नेत्यांनी आता लक्ष्मण रेषा आखून घ्यायला हवी. कुठे थांबायचे, ते ठरवायला हवे. असे असले, तरी पक्ष म्हणून त्यांच्या तालुक्यात असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही जपणारच. तेही त्यांच्या कार्यकर्त्यांना जपतील, यात शंका नाही. ते महसूलमंत्री आहेत. ते कुठे कमी पडले, तर भाजप पक्ष म्हणून आम्ही त्यांना जाब विचारू. 

आजोबांच्या शिकवणीची आठवण

डाॅ. विखे म्हणाले, की (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांनी शिकवण दिली, की पदामुळे आपल्याला किंमत नको, तर आपल्यामुळे पदाला किंमत मिळायला हवी, हेच आम्ही सांभाळत आहोत. नामदार झाले म्हणून लोक काही लोकांना ओळखतात. पद गेल्यानंतर त्यांच्यापासून लोक दूर जातात. परंतु विखे कुटुंबात असे कधीच झाले नाही. पद असो किंवा नसो, जनता विखे कुटुंबावर प्रेम करते. राजकारण हे आमचे घर चालविण्याचे साधन नाही. त्यामुळे पद गेले काय आणि आले काय, आम्ही निवांतपणे जगू शकतो.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख