पिंप्रीलौकी अजमपूरमध्ये विखे - थोरात गटात सरळ लढत - Vikhe in Pimprilauki Azampur - Straight fight in Thorat group | Politics Marathi News - Sarkarnama

पिंप्रीलौकी अजमपूरमध्ये विखे - थोरात गटात सरळ लढत

आनंद गायकवाड
शनिवार, 9 जानेवारी 2021

ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमध्ये थोरात गटातून ज्ञानदेव गिते हे आजोबा विरुध्द विखे गटातून त्यांचा नातू अनिल गिते आमने- सामने असल्याने ही लढत रंगतदार ठरणार आहे.

संगमनेर : संगमनेर तालुक्‍याच्या पूर्व भागातील आश्वीगट राजकियदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या गटातील पिंप्रिलौकी अजमपूर या सुमारे पाच हजार लोकसंख्या व 3 हजार मतदार असलेल्या ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होवू घातली आहे.

या सर्व जागांवर पारंपरिक विरोधक समजले जाणारे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी एकास एक उमेदवार उभे केले आहेत. यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरळ लढत होत आहे. 

मतदार संघ पुर्नरचनेत संगमनेर तालुक्‍यातील 28 गावे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदार संघाला जोडली गेली. या आगोदरपासून आश्वी गटातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्वासाठी व स्थानिक नेत्यांचा अस्तित्वासाठी लढा सुरू होता. मतदार संघ विभाजनानंतर या भागावर विखे पाटील यांचे वर्चस्व आले. मात्र या परिसरातील पुर्वांपार विरोध प्रत्येक निवडणुकीत दिसून येतो.

या भागातील पिंप्रिलौकी अजमपूरच्या ग्रामपंचायतीवर सुमारे दहा वर्षांपासून विखे गटाची सत्ता आहे. या सुमारास आमदार निधी तसेच जिल्हापरिषदेच्या विविध योजनांद्वारे आलेल्या निधीतून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी विकासकामे केली आहेत. यात तीन कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना, पिंप्री फाटा, पानोडी गावांना जोडणारे सुमारे सात कोटी रुपयांचे रस्ते, वाड्या वस्त्यांवरील खडीकरण व मुरमीकरण, कोरडवाहू शेती प्रकल्पांतर्गत साडेतीन कोटींचे काम, जलसंधारणासाठी एक कोटी रुपये खर्चातून पाच वसंत बंधारे, 30 हायमास्ट दिवे, अंगणवाडी, समाजमंदिर, मंदिर सुशोभिकरण, पथदिवे, व्यायामशाळा प्राथमिक शाळेचे डिजीटायझेशन आदी कामे केली आहे. 

या वेळच्या निवडणुकीत पुन्हा विखे प्रणित जनसेवा मंडळ व थोरात प्रणित शेतकरी विकास मंडळ आमने- सामने असून, विकास कामांच्या जोरावर निवडणुकीत यश मिळण्याची खात्री जनसेवा मंडळाने व्यक्त केली आहे. या वेळी विखे पाटील समर्थक दोन्ही गट एकत्र आले असून, जनसेवा मंडळाचे नेतृत्व भारत गिते, प्रा. कान्हू गिते, भाऊसाहेब लावरे, आर. डी. कदम करीत आहेत. शेतकरी विकास मंडळाचे आघाडीचे कार्यकर्ते बाळकृष्ण दातीर यांचे नुकतेच निधन झाले आहे. मात्र ही धुरा बाबुराव लावरे, प्रभाकर दातीर, भिका गिते करीत आहेत. 

आजोबा विरुद्ध नातू 

या ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमध्ये थोरात गटातून ज्ञानदेव गिते हे आजोबा विरुध्द विखे गटातून त्यांचा नातू अनिल गिते आमने- सामने असल्याने ही लढत रंगतदार ठरणार आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख