जामखेड : माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंद्दे समर्थक जगन्नाथ राळेभात तसेच खासदार डॉ. सुजय विखेंचे समर्थक अमोल राळेभात या दोघांपैकी एकजण हे आमदार रोहित पवारांचा मदतीमुळे बिनविरोध संचालक होणार आहेत.
विखे-पवारांच्या ऐनवेळी धावलेल्या छुप्या सहमती एक्सप्रेसमुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना पुढे असलेले माजी मंत्री राम शिंदे मात्र अखेरच्या टप्प्यात काहीसे दुर राहिले असून, आमदार रोहित पवारांनी अखेरच्या टप्प्यात बाजी मारीत 'बिनविरोध' निकालाचा चेंडू स्वतः च्या कोर्टातून टोलवला आहे. त्यामुळे या निकालाने विखेंना पवारांचा मदतीने लाभच झाला, तर शिंदेंची मात्र पुन्हा राजकीय कोंडी झाली.
जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक जगन्नाथ राळेभात यांनी व त्यांचे पूत्र अमोल राळेभात यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोघांपैकी एकाच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झालेले असताना ऐनवेळी आमदार रोहित पवारांनी बँकेच्या निवडणूकीत उडी घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरविले.
राळेभात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत माजी मंत्री राम शिंदे उपस्थितीत बिनविरोध निवडणूक प्रक्रीयेला ब्रेक लावणारी ठरली. ऐनवेळी आमदार रोहित पवारांनी यांचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीतील उत्कंठता वाढविली. राळेभात यांच्या बिनविरोध निवडणूक निकालाच्या निर्णयाला राजकीय ब्रेक लावला.
मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता राळेभात यांचे पुत्र तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा करुन हा राजकीय ब्रेक हटविण्याची विनंती केली.
दोन्ही बाजूने चर्चा झाली आणि अखेर शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जामखेड तालुक्यातील जिल्हा बँकेच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा निर्णय झाला. आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोसले यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली आणि त्यानुसार भोसले यांनी माघार घेतली.त्यामुळे विखे गटाचे राळेभात पिता-पूत्रा पैकी एकाचा बँकेत बिनविरोध संचालक म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा झाला. यानिमित्ताने आमदार रोहित पवारांनी सहकाराच्या राजकारणातील साखर पेरणी तालुक्यात केली आहे.
या निवडणुकीमध्ये राळेभात पिता पुत्रापैकी एकाला बिनविरोध संचालक म्हणून बँकेत पाठवताना आमदार रोहित पवार यांनी आपल्या मर्जीशिवाय मतदार संघात कोणतेच महत्त्वाचे राजकीय निर्णय होणार नाहीत, यावरच जणू काही शिक्कामोर्तबच केले आहे.
Edited By - Murlidhar karale

