विखे पाटलांचे मुख्य सचिवांना पत्र, ही केली मागणी

वादळी वाऱ्याने उखडून पडलेले विजेचे खांब आणि जळालेली रोहित्रे पुन्हा नव्याने बसवून देण्याबाबत वीजवितरण कंपनीने यंत्रणा कार्यान्वित करावी.
radhakrushna vikhe.jpg
radhakrushna vikhe.jpg

राहाता : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली. 

विखे पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की जिल्ह्यात विविध पिकांसह फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्या जनावरांमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करून तातडीने मदतीचे प्रस्ताव पाठविले जावेत. ऊसशेती, डाळिंबबागा, घासशेती, काढणीसाठी आलेला आंबा जमीनदोस्त झाला. भाजीपाल्याची पिके व कांदाचाळींत साठविलेला कांदा पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागला. जिल्ह्यासह शिर्डी मतदारसंघातही वाकडी, नपावाडी, कोऱ्हाळे या गावांत जनावरे जखमी होऊन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. घरांची झालेली पडझड, शाळाखोल्यांचे उडालेले पत्रे, जनावरांचे गोठे, पोल्ट्री शेड व शेडनेट, पॉलिहाऊसच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुरुस्तीबाबत प्रशासनाने सहकार्य करावे. 

विजेचे खांब उखडले असून, रोहित्रे जळाल्याने गावांचा वीजप्रवाह खंडित झाला. सध्या गोदावरी आणि प्रवरा पात्रांत पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन, खंडित झालेला वीजप्रवाह पुन्हा सुरळीत करावा. वादळी वाऱ्याने उखडून पडलेले विजेचे खांब आणि जळालेली रोहित्रे पुन्हा नव्याने बसवून देण्याबाबत वीजवितरण कंपनीने यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

हेही वाचा...

वादळाचा तडाखा बसलेल्यांना आर्थिक मदत द्या

कोपरगाव : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा तालुक्‍याला बसला असून, घरांचे नुकसान झाले आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नुकसानीचा आढावा घेतला असून, तातडीने पंचनामे करून या आपत्तिग्रस्तांना आर्थिक पॅकेजची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री व आपत्ती मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोपरगाव तालुका परिसराला बसला. या आपत्तीने अनेकांची घरे उद्‌ध्वस्त केली. झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. कर्ज काढून जिवापाड जपलेल्या शेतकऱ्यांच्या फळबागांबरोबरच अन्य पिकांचेही नुकसान झाले. कोरोना आपत्तीमुळे सध्या सगळेच घरी सुरक्षित आहेत. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, मुक्‍या जनावरांचे या वादळात हाल झाले. शासनाने तत्काळ नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना आर्थिक पॅकेज द्यावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com