Vikhe Patil's consolation to Palihouse, sednet holders | Sarkarnama

राज्यातील पाॅलिहाऊस, शेडनेटधारकांना विखे पाटील यांचा दिलासा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 जून 2020

तहसील आणि कृषी विभागाने वडगाव मावळचा पॅटर्न राबवून पंचनाम्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याची सूचना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

संगमनेर : निसर्ग वादळाने पिकांबरोबरच पॉलिहाऊस आणि शेड नेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान भरपाई देण्याचा निर्णय करताना शेड नेट आणि पॉलिहाऊसधारकांनाही दिलासा देण्याचा विचार शासनाने करावा. यासाठी तहसील आणि कृषी विभागाने वडगाव मावळचा पॅटर्न राबवून पंचनाम्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याची सूचना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथील शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, की निसर्ग वादळाच्या संकटामुळे आधुनिक शेतीकडे वळालेल्या तरुण शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस आणि शेड नेटच्या संपूर्ण स्ट्रक्‍चरचेही नुकसान झाले. यासाठी वापरण्यात येणारा कागदही वादळ आणि पावसाने फाटल्याने ते नव्याने उभे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी यासाठी बॅंकांची कर्जे काढली आहेत. या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. 

उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी पॉलिहाऊस आणि शेड नेटच्या नुकसानीची माहिती दिली. तहसीलदार अमोल निकम यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. नैसर्गिक आपत्ती नियमात पॉलिहाऊस आणि शेड नेटच्या नुकसानीच्या मदतीबाबतचा कोणताही उल्लेख नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्र्यांशी चर्चा करून मदत करण्याबाबत आपण आग्रह धरू, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.

बॅंक अधिकाऱ्यांनी शासकीय अनुदानाची रक्‍कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. याबाबत बॅंकिंग समितीचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, अशा तक्रारींची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा...

36 हजार व्यक्तींची एसटीद्वारे घरवापसी! 

नगर : एसटी महामंडळाच्या नगर व ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या आगारातील 1567 बसद्वारे 35 हजार 667 जणांना घरी सोडण्यात आले. 
कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर केले. त्यात अनेकांचा रोजगार गेला. काही जण कोरोनाच्या भीतीने घरी परतण्याच्या तयारीत होते. मात्र, वाहने मिळत नसल्याने ते अडकून पडले. या सर्वांना एसटी महामंडळाने बसद्वारे घरी सोडले. त्यात ठाणे व नगर विभागातील 1567 बसमधून एकूण 35 हजार 667 जणांना राज्यासह परराज्यांत त्यांच्या घरी, तर काहींना रेल्वेस्थानकापर्यंत नेऊन सोडल्याचे विभागनियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.  प्रवाशांना सोडताना एकाही एसटी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली नाही. एसटीकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याने व बस सॅनिटाइझ केल्या जात असल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख