म्हस्के यांच्या बिनविरोधमुळे जिल्हा बॅंकेत विखे पाटील यांचे "खाते' उघडले - Vikhe Patil's "account" was opened due to Mhaske's unopposed | Politics Marathi News - Sarkarnama

म्हस्के यांच्या बिनविरोधमुळे जिल्हा बॅंकेत विखे पाटील यांचे "खाते' उघडले

सतीश वैजापूरकर
सोमवार, 25 जानेवारी 2021

विखे परिवाराच्या निकटवर्तीय असलेले म्हस्के हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार झाले होते.

शिर्डी : जिल्हा बॅंक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेवा संस्था (सोसायटी) मतदारसंघातून माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निमित्ताने तालुक्‍यातील सहकारी सेवा संस्थांवर आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिध्द केले. तसेच जिल्हा बॅंक निवडणुकीत खाते देखील उघडले. 

विखे परिवाराच्या निकटवर्तीय असलेले म्हस्के हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार झाले होते. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील व तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्याने त्यांना जलसंपदा विभागाचे राज्यमंत्रीपद देखील मिळाले होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा कार्यकाल प्रारंभ झाल्यानंतर त्यांनी त्यांना सदैव साथ दिली. कायद्याचे पदविधर असलेले म्हस्के हे शेती व सहकारातील जाणकार नेते म्हणून ओळखले जातात. जिल्हा सहकारी बॅंकेत त्यांना सलग दुसऱ्यांदा संचालकपदाची संधी देण्यात आली. त्यामुळे त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी डॉ. अभिजित दिवटे उपस्थीत होते. 

शिर्डी विधानसभा मतदार संघात मतदानाचा अधिकार असलेल्या 73 संस्था आहेत. त्यापैकी 68 संस्था विखे गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळे माजी आमदार म्हस्के यांनी जिल्हा बॅंकेतील निवड निश्‍चित समजली जात होती. 

आता केवळ औपचारिकता बाकी ः विखे पाटील 

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. आम्ही त्यांना सलग दुसऱ्यांदा जिल्हा बॅंकेवर संधी देण्याचा निर्णय घेतला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने या निर्णयास पाठबळ दिले. ग्रामपंचायत निवडणुकांपाठोपाठ जिल्हा बॅंकेत मिळविलेले हे यश समाधान देणारे आहे, असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख