`विखे पाटील टाळुवरील केस उपटत असतील`

`विखे-पाटलांची कमळा` हा एक चित्रपट आला व पडला. काॅंग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची `टूर अॅण्ड ट्रॅव्हल` कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे.
vikhe radhakrushna.jpg
vikhe radhakrushna.jpg

नगर : ``विखे पाटील अधूनमधून बोलतात, `आम्ही भाजपमध्ये खूश आहोत,` जे विखेंना ओळखतात, ते यावर विश्वास ठेवणार नाहीत. भाजपमध्ये गेल्याच्या चिडीतून ते टाळूवरचे केस उपटत असतील,`` अशी बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या एका दैनिकाने अग्रलेखातून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली आहे.

गेल्या आठवड्यापासून विखे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून आधी काॅंग्रेसवर टीका झाली होती. त्यावर थोरात यांनी `शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल,` असे सांगून पुन्हा चांगला अग्रलेख येईल, असेही म्हटले होते. ही सामंज्यशाची भूमिका घेत थोरात यांनी या वादावर पडता टाकला होता, तथापि, भाजपचे आमदार विखे पाटील यांनी मात्र थोरात यांच्यावर टीका केली. `सत्तेसाठी ते लाचार` झाले असल्याचे ते म्हणाले होते. या वर थोरात यांनीही विखे पाटलांच्या टीकेला खरमरीत शब्दांत उत्तर दिले होते. `विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या कसे पाया पडत होते, ते आपण पाहिल्याचे` त्यांनी सांगितले होते. ही टीका विखे पाटलांना जिव्हारी लागली. त्यावर थोरात यांचा त्यांनी आक्रमक शब्दांत समाचार घेतला होता. `त्यावेळी थोरात मुख्यमंत्र्यांचे पाय चोपत होते का,` असे विखे म्हणाले होते. या वाद प्रतिवादाच्या नाट्यावर पडदा पडण्याऐवजी हा वाद वाढतच चालला आहे. 

आज तर शिवसेनेच्या मुखपत्रातील आग्रलेखात विखे पाटलांवर जोरदार टीका झाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ``महाराष्ट्र सरकार स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत कारभार सुरू आहे. फार पूर्वी `थोरातांची कमळा` हा चित्रपट खूप गाजला होता. `विखे-पाटलांची कमळा` हा एक चित्रपट आला व पडला. काॅंग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची `टूर अॅण्ड ट्रॅव्हल` कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय,`` अशा शब्दांत या अग्रलेखातून विखे पाटील यांची खरडपट्टी काढली आहे.

भाजपच्या गोधडीत शिरलेले बाटगे

विखे पाटील यांच्यावर लिहिलेल्या या अग्रलेखात म्हटले आहे, ``निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते, ते भाजपमधील गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत. आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करीत नाही, हे त्या प्रत्यकाच्या बाबतीत दिसून आले. विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोरात वगैरे मंडळींचे कष्ट त्या दिशेने तोकडे पडले, इतकेच म्हणावे लागेल,`` अशा शब्दांत विखे पाटील यांचा समाचार घेतला आहे.

कोलांटी उडीचे डोंबारी

विखे पाटलांनी काॅंग्रेसचा त्याग केल्याने काॅंग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपमध्ये गेल्याने भाजपचा दीडकीचा फायदा झाला नाही. विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते, तर आज ते सरकारात काॅंग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांट उडीचे डोंबारी राजकारणात प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत, ते त्यांनीच एकदा आठवून पहावे, असेही त्या अग्रलेखात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com