विखे पाटील, तनपुरेंनी कर्डिलेंना झुंजायला लावले ! - Vikhe Patil, Tanpur planted Kardile to fight | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटील, तनपुरेंनी कर्डिलेंना झुंजायला लावले !

मुरलीधर कराळे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधातील अर्ज मागे घेण्यात न आल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी आज अर्ज माघारीच्या दिवशी 17 जागा बिनविरोध झाल्या. त्यामध्ये जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे यांचा समावेश राहिला. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधातील अर्ज मागे घेण्यात न आल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्डिले यांनी संगमनेरला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या बैठकिला उपस्थित राहून थोरात यांना अप्रत्यक्षरित्या साथ दिली. त्याचाच परिपाक म्हणून अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या बिनविरोधबाबत उत्सुकता कायम राहिली. अखेर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते मंत्री प्राजक्त तनपुरे व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाकलेल्या डावात कर्डिले यांना झुंजायला लावले, असे मानले जाते.

`मास्टरमाईंड` ठरणार होते पण...

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत अनेकदा कर्डिले मास्टरमाईंड ठरतात. त्यां सल्ला बहुतेक नेत्यांना कामे येतो. त्यांची टोपी फिरली, की राजकारण फिरते, असे मानले जाते. या निवडणुकीत मात्र माशी शिंकली. कर्डिले यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. नगर तालुक्यातील बहुतेक सेवा संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत. त्यामुळे त्यांना ही निवडणूक अवघड नाही, असे चित्र आहे. असे असताना त्यांच्या विरोधात पद्मावती संपतराव म्हस्के व सत्यभामा भगवानराव बेरड यांचेच अर्ज उरले होते. आज म्हस्के यांनी अर्ज मागे घेतला, मात्र सत्यभामा बेरड यांनी ऐनवेळी अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे कर्डिले यांच्या विरोधात बेरड अशी लढत निश्चित झाली.

बेरड या राष्ट्रवादीचे नेते भगवानराव बेरड यांच्या पत्नी आहेत. महाआघाडीची सुत्रे बाळासाहेब थोरात यांनी हलविली. कर्डिले यांना बिनविरोधसाठी थोरात यांनी बेरड यांना का आदेश दिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तथापि, विखे पाटील व तनपुरे यांच्यामुळे हा अर्ज ठेवण्यात आला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख