Vikhe Patil made a big blast on the occasion of his birthday | Sarkarnama

वाढदिवसानिमित्त विखे पाटील यांनी केला हा मोठा गाैप्यस्फोट

सतीश वैजापूरकर
सोमवार, 15 जून 2020

शेती, सहकार, शिक्षण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे जाणकार म्हणून परिचित असलेल्या आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वयाची एकसष्ट वर्षे पूर्ण करून बासष्टाव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

शिर्डी : ``भाजपमध्ये जाण्याचा माझा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच झालेला होता,`` असा गाैप्य स्फोट आज माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला लाभले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस व सहकारी नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण राज्यात काम करीत आहोत. मला माझ्या भुमिकेचा कधीही पश्चात्ताप वाटलेला नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा माझा निर्णय चुकला वगैरे काही नाही, अशी पुष्टी त्यांनी दिली.

शेती, सहकार, शिक्षण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे जाणकार म्हणून परिचित असलेल्या आमदार विखे पाटील यांनी आज वयाची एकसष्ट वर्षे पूर्ण करून बासष्टाव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

प्रश्न : महाआघाडी सरकारबाबत तुम्हाला काय वाटते ?

विखे पाटील : फेसबुकवरून कारभार करणारे हे राज्यातील पहिलेच सरकार आहे. लॉकडाऊनच्या काळात या सरकारने दुर्लक्ष केल्याने फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दुधाचे भाव पडल्याने हा शेतीपूरक व्यवसाय तोट्यात गेला. यंदा मान्सुन वेळेवर आला, तर खरिपाच्या पेरणीसाठी बॅंका कर्ज देईनात. रासायनिक खते आणि बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली. शेती आणि शेतकरी टेकला, तर ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त होईल. दुर्दैवाने याचे भान राज्य सरकारला नाही, याचे खूप वाईट वाटते, अशी विखे पाटील यांनी व्यक्त केली. 

प्रश्‍न ः राज्यात युतीचे सरकार असताना आपण विरोधीपक्ष नेते होता. आता राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. आपला भाजपमध्ये जाण्याचा निर्णय चुकला असे वाटते का?

विखे पाटील : मुळातच हा प्रश्‍न चुकीचा आहे. निवडून येण्याची क्षमता असताना डॉ. सुजय विखे यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी मी विरोधीपक्ष नेता असताना देखील कॉग्रेस पक्षातील वरिष्ठ व राज्यपातळीवरील नेत्यांनी ठोस भुमिका घेतली नाही. त्यातून डॉ. विखे पाटील हे भाजपकडून खासदार म्हणून लोकसभेत गेले. त्याचवेळी मी भाजपत जाणार, हे नक्की झाले होते. राज्यात मंत्रीपद मिळावे, या एकाच कारणास्तव मी भाजपत गेलो, असे म्हणता येणार नाही. माझा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच झालेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला लाभले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस व सहकारी नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण राज्यात काम करीत आहोत. मला माझ्या भुमिकेचा कधीही पश्चात्ताप वाटलेला नाही. त्यामुळे निर्णय चुकला वगैरे काही नाही. 

प्रश्‍न ः- लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काय करायला हवे होते, असे आपणास वाटते ?

विखे पाटील : राज्यातील सर्व साखर कारखान्यांची गोदामे रिकामी आहेत. शिवाय गावोगावची मंगल कार्यालये देखील उपलब्ध होती. तेथे फळे व भाजीपाला आणून तो थेट शहरातील ग्राहकांपर्यंत नेणे अवघड नव्हते. मी कृषिमंत्री होतो, त्यावेळी सरकारी यंत्रणेने हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. शेतमालाला चांगला भाव मिळाला आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळाला. देशाला परकीय चलन मिळवून देणारी द्राक्षे व डाळिंब यासारखी फळे, पेरू, चिकू, टरबूज आणि खरबूज यासारखी फळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना एकतर कवडीमोल दराने विकावी लागली किंवा फेकून द्यावी लागली. भाजीपाला आणि फळे उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पणनमंत्री आणि कृषिमंत्री या काळात कुठेच दिसले नाहीत. विक्री व्यवस्थेची साखळी तुटली. ती अद्यापही व्यवस्थित जुळलेली नाही. पणनमंत्र्यांनी पुढे येऊन ही यंत्रणा उभारायला हवी होती. त्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबरच व्यापाऱ्यांची देखील मदत घेता आली असती. मी कृषिमंत्री असताना डाळिंब व बेदाण्याचे भाव पडले. त्यावेळी राज्यातील प्रमुख व्यापाऱ्यांना बोलावून कारवाईचा इशारा देताच अवघ्या तीनच दिवसात भाव पूर्वपदावर आले. इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधीपक्षात अशा संकटकाळात काम करण्याचा अनुभव असलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली, या अनुभवी मंडळींची बैठक घ्या. आपण राजकीय जोडे बाजूला ठेवू शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला वाचवू. असे आवाहन केले, प्रतिसाद शून्य होता. उघड्या डोळ्यांनी शेतकरी उध्वस्त होताना पाहण्याची वेळ आली. 

प्रश्‍न ः ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काय करावे लागेल असे तुम्हाला वाटते ?

विखे पाटील : ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काय करावे लागेल, हे सरकारमधील नेत्यांना माहिती नाही, असे मी म्हणणार नाही. मात्र त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाही. हे अपघाताने सत्तेत आलेले सरकार आहे. त्यांच्यात एकजिनसीपणा नाही. मंत्री मुंबईतील बंगल्यातून बाहेर निघत नाही. अधिकाऱ्यांच्या हाती कारभार सोपवून फेसबुकवरून गप्पा मारण्यात त्यांना धन्यता वाटते. ग्रामीण भागाकडे त्यांनी पाठ फिरविली आहे. शहरातील नोकऱ्या गेल्याने तेथील लोक मोठ्या संख्येने ग्रामीण भागात आले आहेत. त्याचा ताण ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबावर पडला आहे. त्यातच शेती आणि दूध व्यवसाय मोडकळीला आला आहे. शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे पहायचे. कोरोनाच्या संकटात राजकीय विधाने करण्याची माझी इच्छा नाही. मात्र शेतकऱ्यांना कुणी वाली राहिला नाही. हे वास्तव नाकारता येणार नाही. 

प्रश्‍न ः आपण कॉग्रेस पक्षात असताना विरोधी पक्षनेते होतात. त्यावेळी तुमची आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या खास मैत्रीची चर्चा असायची. आपण फिक्‍सींग करता, अशी टीका कॉग्रेस पक्षातील नेते करायचे. नेमकी परिस्थिती कशी होती ?

विखे पाटील : विरोधी पक्षनेता म्हणजे मुख्यमंत्र्यांना सतत विरोध, अशी कल्पना करून चालत नाही. आक्रस्ताळेपणा आणि मुद्यांवर ठेवत केलेला विरोध या भिन्न बाबी आहेत. मला आक्रस्ताळेपणा आवडत नाही. विरोधी पक्षनेता या नात्याने सामान्य जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडणे. सरकारवर विधायक मार्गाने व जनतेच्या प्रश्‍नासाठी अंकुश ठेवणे अभिप्रेत असते. ते मी प्रामाणिकपणे केले. प्रश्‍न आणि त्याची उकल कशी करायची, याचीही मांडणी केली. त्याची अनेकदा सरकारने दखल घेतली. 
दिवंगत नेते विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे एकमेकांचे खास मित्र होते. शालेय जिवनापासून त्यांच्यात घट्ट मैत्री होती. परस्पर विरोधी पक्ष व भुमिका असतानादेखील काही वेळा एकाच व्यासपीठावर येऊन गप्पांची झकास मैफील जमवायचे. दोघांनीही आपल्या भुमिका समर्थपणे पार पाडल्या. विरोधी पक्षनेत्याला सभागृहात स्वतःला सतत सिद्ध करावे लागते. ते मी अनेकदा केले. राजकारणात कुणी नाराजीपोटी माझ्यावर काही टीका टिपणी केली असेल, तर त्याला एवढे महत्व द्यायचे कारण नाही. मैत्री आणि पद या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याची गल्लत करून चालत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे मला कुणाचा शिफारसपत्राची गरज त्यावेळीही नव्हती आणि आता देखील नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख