राहाता : तालुक्यातील 25 पैकी 23 ग्रामपंचायतींवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्चस्व राखले. मात्र, लोणी खुर्द ग्रामपंचायतीत परिवर्तन मंडळाचे एकनाथ घोगरे व जनार्दन घोगरे यांनी 20 वर्षांनंतर सत्तांतर घडवीत, विखे गटाला जोरदार धक्का दिला. विखे गटानेही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बाभळेश्वर व हनुमंतगाव या दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. बऱ्याच ठिकाणी विखे समर्थकांमध्येच लढत झाली. त्यांतील सहा ग्रामपंचायती विखे गटाने पूर्वीच बिनविरोध ताब्यात घेतल्या होत्या.
बाभळेश्वर येथे राष्ट्रवादीचे रावसाहेब म्हस्के व विखे गटात सहमतीचे राजकारण होते. तेथील म्हस्के गटाची 30 वर्षांहून अधिक काळाची सत्ता यंदा विखे गटाचे तुकाराम बेंद्रे, बबलू म्हस्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतली. येथे विखे गटाला 14, तर म्हस्के गटाला तीन जागा मिळाल्या. हनुमंतगाव येथे राष्ट्रवादीचे भास्कर फणसे यांची 10 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. विखे गटाचे अशोक घोलप यांच्या पॅनेलने सर्व 11 जागा जिंकल्या.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिंगवे, जळगाव व रामपूरवाडी येथे राजकीय समीकरणे बदलली. शिंगवे येथे कोल्हे गटाच्या राजाराम काळे यांच्या गटाला आठ, तर बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील काळे व विखे यांच्या संयुक्त गटाला तीन जागा मिळाल्या. जळगावात सत्तांतर झाले. भाजपचे गंगाधर चौधरी व विखे गटाचे सुभाष चौधरी यांचे वर्चस्व होते. यंदा काळे गटाचे दिलीप चौधरी, विखे गटाचे यशवंत चौधरी यांनी 11 पैकी 8 जागा जिंकल्या. रामपूरवाडीत विखे गटाचे विजय सदाफळ यांनी काळे गटासोबत वर्चस्व राखले. रांजणगाव ग्रामपंचायतीत विखे गटाचे सोपान कासार व रावसाहेब गाढवे यांच्या मंडळाला 13 पैकी 11 जागा मिळाल्या.
चंद्रापूर येथे विखे समर्थक शहाजी घुले व बन्सी तांबे यांच्या मंडळाला अनुक्रमे चार व तीन जागा मिळाल्या. वाळकीत विखे समर्थक सचिन कान्होरे यांच्या मंडळाला सातपैकी सहा जागा मिळाल्या. अस्तगावात विखे समर्थक जनसेवा विकास व जनसेवा या दोन्ही मंडळांना अनुक्रमे नऊ व आठ जागा मिळाल्या. नांदूर येथे विखे समर्थक विशाल गोरे यांच्या मंडळाला 10 पैकी 9 जागा मिळाल्या. कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, लोणी बुद्रुक, तिसगाव, सावळीविहीर खुर्द व पिंपरी लोकाई या ग्रामपंचायती विखे गटाने बिनविरोध ताब्यात घेतल्या.
Edited Byu - Murlidhar Karale

