कोल्हार : कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीची या वेळी बिनविरोधची हॅटट्रिक झाली आहे. ग्रामपंचायतीत 2010 पासून सलग दोन वर्ष सहमती एक्सप्रेस विनाथांबा धावली आहे. यंदाची तिसरी निवडणूकही बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतीमधील एकूण 17 सदस्यांपैकी या वेळी विखे गटास आठ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते ऍड. सुरेंद्र खर्डे गटाला आठ असे समान वाटप करण्यात आले. सरपंचपद अडीच अडीच वर्ष दोन्ही
गटाला देण्याचे ठरले आहे.
या वेळी एका अपक्षाला सदस्यपद मिळण्याची प्रथमच संधी मिळाली आहे. ते सदस्य दोन्ही गट मिळून असल्याचे सांगण्यात येते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच ऍड. सुरेंद्र खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध होण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सामंजस्यची भूमिका व प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत. कोल्हारचे विद्यमान सरपंच रीना खर्डे व माजी सरपंच ऍड. सुरेंद्र खर्डे हे दीर भावजय व उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे यांचा नवीन सदस्यांमध्ये पुन्हा समावेश आहे.
अपक्ष अमोल खर्डे यांना ग्रामपंचायतीत संधी मिळाली आहे. राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या कोल्हार ग्रामपंचायतीत सहमती एक्सप्रेस धावणार की थांबणार? याविषयी गावकऱ्यांची उत्सुकता ताणलेली होती.
दरम्यान, निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून दोन्ही गटातील चर्चेचे गुर्हाळ सुरूच होते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची 15 वर्षांपूर्वीची विखे व खर्डे गटातील लक्षवेधी व ऐतिहासिक लढत वगळता गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये दोन्ही गटांमध्ये सहमती झाली होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये सुरेंद्र खर्डे गटाचे
10 व विखे गटाचे (जनसेवा) सात सदस्य आहेत. दहा वर्षांपासून सरपंचपद ऍड. सुरेंद्र खर्डे घराण्याकडेच होते. या वेळी सरपंच पदाचे आरक्षण काय निघते, यावर सरपंच कोण होईल? हे ठरेल.
विखे गटाचे सदस्य : अरुण निबे, सविता खर्डे, शोभा लोखंडे, ज्ञानेश्वर खर्डे, स्वाती राऊत, श्रावणी बेद्रे, संतोष लोखंडे व मनोज थेटे.
खर्डे गटातील सदस्य : ऍड. सुरेंद्र खर्डे, रीना खर्डे, सुरेखा खर्डे, कैलास अंत्रे, शिवाजी निकुंभ, निवेदिता बोरुडे, कोमल बर्डे, व नंदा शेळके.
अपक्ष : अमोल खर्डे.
Edited By - Murlidhar Karale

