जिल्हा बँकेसाठी पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत ! - Veterans of Parner taluka will fight for District Bank! | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बँकेसाठी पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत !

मार्तंड बुचुडे
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

शिवसेनेच्यावतीने रामदास भोसले व भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच विखे गटाच्या वतीने राहुल शिंदे यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. 

पारनेर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज माघारीसाठी अद्याप वेळ आहे. मात्र अता तालुक्यातून सेवा संस्था मतदार संघातून बँकेच्या संचालक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके तसेच विद्यामान संचालक उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेनेच्यावतीने रामदास भोसले व भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच विखे गटाच्या वतीने राहुल शिंदे यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. आता नेमकी कोण माघार घेणार व कोणात लढत होणार, की मागील पंचवार्षिक प्रमाणे शेळके यांना बिनविरोध देणार याचीच चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

राज्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी असली तरीही तालुक्यात मात्र त्यांची अघाडी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या वेळी तरी शेळके यांना बिनविरोध निवडून जाण्याचे संकेत दिसत नाहीत. त्यातच आमदार लंके यांनी अर्ज दाखल केल्याने नेमकी उमेद्वारी कोणाची राहाणार, या चर्चेला उधान आले आहे. मात्र जर माजी आमदार विजय औटी यांचा उमेद्वारी अर्ज असता तर आमदार लंके यांची उमेद्वारी ऩिश्चित मानली जात होती आता औटी यांनी अर्ज दाखल न केल्याने लंके आपला उमेद्वारी अर्ज मागे घेण्याची शक्यता जवळजवळ निश्चित आहे.

पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे नुकतेच जिल्हा दाैऱ्यावर आले होते, त्या वेळी शेळके व पवार हे एकत्र हेलीकॉप्टरमध्ये मुंबईस रवाना झाल्याने त्यांची उमेद्वारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. 

शेळके यांचा सामना आता रामदास भोसले व राहुल शिंदे यांच्याबरोबर होणार, की या दोघांपैकी कोणीतरी माघार घेणार व तालुक्यातील लढत दुरंगी होणार की तिरंगी हे मात्र अर्ज माघारी नंतरच समजणार आहे. 

जिल्हा बँकेच्या संचालकपद हे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही राजकिय द्रुष्ट्या प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे या पदाला जिल्हापातळीवर महत्व प्राप्त झाले आहे. बहुतेक तालुक्यातील आमदार किंवा राजकिय वजनदार व्यक्तीच अत्तापर्यंत या पदावर संचालक म्हणून निवडून दिलेले आहेत.

तालुक्यात 105 सेवा संस्थेचे मतदार आहेत. सेवासंस्थांचे ठराव करतानाच शेळके यांनी त्यात लक्ष घातले होते. ठऱाव कोणाच्या नावे करावयाचा हे सुद्धा अनेक ठिकाणी शेळके यांनीच लक्ष घालून ठरविल्याने शेळके यांचा विजय सोपा मानाला जात आहे. 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख