भर रस्त्यात पोलिस निरीक्षकांना शेतकरी नेत्यांनी सुनावले खडे बोल - Verbal clashes between police inspectors and farmer leaders across the street | Politics Marathi News - Sarkarnama

भर रस्त्यात पोलिस निरीक्षकांना शेतकरी नेत्यांनी सुनावले खडे बोल

विलास कुलकर्णी
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

 "अटक केल्यास, आंदोलन तीव्र केले जाईल," असा इशारा मोरे यांनी इशारा दिल्यावर पोलिसांनी सौम्य भूमिका घेतली.

राहुरी : राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावर कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रस्ता रोको व केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनप्रसंगी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व 'स्वाभिमानी' चे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यात भर रस्त्यावर शाब्दिक चकमक उडाली.

 "अटक केल्यास, आंदोलन तीव्र केले जाईल," असा इशारा मोरे यांनी इशारा दिल्यावर पोलिसांनी सौम्य भूमिका घेतली.

राहुरी येथे आज कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर- मनमाड रस्त्यावर 'स्वाभिमानी' चे उत्तर जिल्हाध्यक्ष मोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष दिनेश वराळे, सतीश पवार, आनंद वने, सचीन पवळे, प्रमोद पवार, निलेश लांबे, प्रवीण पवार, किशोर वराळे, विजय तोडमल, सचीन म्हसे, सचीन गडगुळे, अतुल तनपुरे व इतरांनी आंदोलन छेडले.

कांदा निर्यात बंदिच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून, भर रस्त्यावर केंद्रीय कृषिमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व सहाय्यक निरीक्षक सचीन बागुल यांनी मोरे यांना पकडून अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. भर रस्त्यात मोरे यांनी पोलिस निरीक्षक देशमुख यांना खडेबोल सुनावले. पोलिसांच्या दडपशाहीमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. 

मोरे म्हणाले, "मागील पंधरा दिवसांपासून कांद्याला भाववाढ मिळाली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेच कांदा निर्यात बंदीच्या निर्णयास कारणीभूत आहेत. केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध झाले. कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये भाजीपाला, फळे, दूध व इतर शेतमाल कवडीमोल भावात विकला. शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या काळात देशभरात बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु शासनाने चित्रपट अभिनेता सुशांतसिंग रजपूत याच्या आत्महत्येला जास्त महत्त्व दिले. 

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कांद्याचे बियाणे महागले. परंतु, निर्यातबंदीमुळे दर कोसळत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची जगणे कठिण केले आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलने छेडले जातील." असा इशारा मोरे यांनी दिला.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख