भाजीविक्रेते चिडले! माल जप्त करताच मोर्चा नगराध्यक्षांच्या घरावर

नव्याने बांधलेल्या ओट्यांवर मंगळवारी व शुक्रवारी व्यवसायास परवानगी दिली. मात्र, व्यावसायिकांना हे मान्य नाही. त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटली. त्यावर पालिका, पोलिस प्रशासनाने त्यांना जमावबंदी आदेशाचे पालन करण्यास बजावले.
vigitable
vigitable

कोपरगाव :शहरातील सर्व दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने आज आठवडे बाजार करणाऱ्या विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटली. मात्र, काही वेळातच पालिका प्रशासनाने त्यांना मज्जाव करीत त्यांचा माल जप्त केला. त्यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी थेट नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरावर मोर्चा नेत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

दरम्यान, पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी जमावास शांत केले. "तुमचा जमाव बेकायदेशीर असून, ताबडतोब न उठल्यास लाठीमार करू,' असा इशारा दिल्यावर विक्रेत्यांनी माघार घेतली. 

आठवडे बाजारात बसणारे, तसेच फिरून भाजीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेने बाजारतळावर नव्याने बांधलेल्या ओट्यांवर मंगळवारी व शुक्रवारी व्यवसायास परवानगी दिली. मात्र, व्यावसायिकांना हे मान्य नाही. त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटली. त्यावर पालिका, पोलिस प्रशासनाने त्यांना जमावबंदी आदेशाचे पालन करण्यास बजावले. मात्र, काही जण ऐकत नसल्याने विक्रेत्यांचा माल जप्त करण्यास सुरवात केली. त्यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी थेट नगराध्यक्ष वहाडणे यांचे घर गाठले. तेथे ठिय्या देऊन घोषणाबाजी सुरू केली. 

विक्रेत्यांचे म्हणणे होते, की बाजारओट्यांवर ग्राहक येत नाहीत. त्यामुळे आमचा माल पडून आर्थिक नुकसान होते. त्यामुळे आमचा उदरनिर्वाह कसा चालणार? पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी विक्रेत्यांना समजावले. "तुम्हाला रस्त्यावर बसू दिले जाणार नाही. जमावबंदीचे आदेश असताना तुमचा जमाव बेकायदेशीर आहे. सांगितलेल्या जागीच व्यवसाय करा, अन्यथा लाठीमार करावा लागेल,' असे सांगूनही विक्रेते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मात्र, समजूत घातल्यावर अखेर ते निघून गेले

कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही : वहाडणे 

मतदार नाराज होऊ नयेत म्हणून कोणी काहीही करा. कुठेही बसा. नियम-कायदे धाब्यावर बसवा, हे मी तरी मान्य करणार नाही. वार किंवा वेळेत बदल करायचा असेल, तर चर्चेतून मार्ग निघू शकतो. कायदा मोडून, गर्दी जमवून प्रशासनावर दबाव आणण्याइतका मोठा नेता मी नाही. राष्ट्रीय आपत्ती असताना आपण प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. 

भाजीविक्रेत्यांच्या आंदोलनावर वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शहरातील सर्वच व्यावसायिकांना संधी मिळावी, यासाठी तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलिसांनी व्यवस्थित नियोजन केले. नेहरू भाजी मार्केट सुरू केले. त्यांच्यासाठी वेळापत्रक व जागा निश्‍चित केली; पण आज पुन्हा काही जण रस्त्यावर बसल्याने प्रशासनाने विरोध केला. नंतर काहींनी महिलांना पुढे करून घरासमोर घोषणाबाजी केली. मी बाहेरगावी असताना, असा गोंधळ घालायला लावणाऱ्या सूत्रधारांना सांगतो, की संपूर्ण शहराचा विचार करा. प्रत्येकाने रस्त्यावर दुकान मांडले, तर रहदारीचे काय? आमच्यावर कुत्रे सोडण्याची धमकी दिली, असे पोरकट आरोप करून मला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला गेला. कुणी कायदा हातात घेतला, तर सहन केले जाणार नाही, असा इशारा वहाडणे यांनी दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रभर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगावात प्रशासन दक्षता घेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com