लसींचा तुटवडा भासू देणार नाही : प्राजक्‍त तनपुरे - Vaccine shortage will not be tolerated: Prajakrut Tanpure | Politics Marathi News - Sarkarnama

लसींचा तुटवडा भासू देणार नाही : प्राजक्‍त तनपुरे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

मंत्री तनपुरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कुठल्याही प्रकारे तिसगाव आरोग्य केंद्राला पीपीईकिटसह लसीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले.

तिसगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांनीच स्वतः बरोबर कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. तिसगाव येथे सुरू करण्यात येणाऱ्या कोरोना सेंटरला सर्व मदत केली जाईल, तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पीपीई कीटसह कोरोना प्रतिबंधात्मक लसीचाही तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही नगरविकास राज्य मंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी दिली. 

पाथर्डी तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने मंत्री तनपुरे यांनी तालुक्‍यातील कोल्हार, करंजी, तिसगाव येथे धावती भेट देत कोरोनाबाबतचा आढावा घेतला. तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मंत्री तनपुरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कुठल्याही प्रकारे तिसगाव आरोग्य केंद्राला पीपीईकिटसह लसीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले.

तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील इमारतीत सुरू करण्यात येणाऱ्या कोरोना सेंटरला तात्काळ बेड उपलब्ध करून देणार असून, या सेंटरला सर्व सुविधा पुरविल्या जातील. डॉक्‍टरांनी रुग्णांची योग्य काळजी घ्यावी, असे सांगितले. 

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथे 50 खाटांचे कोवीड सेंटर उभारले जाणार आहे. या उपक्रमाचे मंत्री तनपुरे यांनी कौतुक केले. रुग्णांना जेवण, मेडिसिन व बेडची व्यवस्था केली जाणार असल्याचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी सांगितले. 

प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्‍याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, सरपंच काशिनाथ लवांडे, इलियास शेख, सुनील पुंड, सरपंच अमोल वाघ, रवींद्र मुळे, बाबासाहेब बुधवंत उपस्थित होते. 

 

हेही वाचा...

आपद्‌ग्रस्त कुटुंबांना संसारोपयोगी वस्तू भेट 

अकोले : तालुक्‍यातील कोंभाळणे येथे नुकतीच तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यात आदिवासी कुटुंबांचे संसार जळून खाक झाले. राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे व प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी या कुटुंबांना आज किराणा व संसारोपयोगी साहित्य दिले. 

रखमाबाई लक्ष्मण पथवे, दशरथ उल्हास उघडे, चंद्रकला नामदेव मेंगाळ, युवराज आनंदा गावंडे यांची घरे आगीत सापडून संसारोपयोगी साहित्य भस्म झाले. याची माहिती मिळताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी ठुबे यांनी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मदतीने या आदिवासी कुटुंबांना किराणा व संसारोपयोगी साहित्य भेट दिले.

या वेळी आमदार डॉ. किरण लहामटे, आदिवासी विकास निरीक्षक गंगाराम करवर, गृहपाल बडे, सी. पी. बडवे, के. बी. भालेराव, सरपंच शांताबाई पोपेरे, उपसरपंच गोविंद सदगीर उपस्थित होते. 

कोंभाळणे येथील ग्रामस्थांनी मदत निधी, तसेच धान्य जमा केले असून, ते लवकरच आपद्‌ग्रस्त कुटुंबांना देण्यात येणार आहे. त्यांना शासनाची मदत मिळवून देण्याचे आश्‍वासनही डॉ. लहामटे यांनी दिले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख