ईडीसारख्या संस्थांचा वापर राजकीय हेतुने : मंत्री एकनाथ शिंदे - Use of institutions like ED for political purposes: Minister Eknath Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ईडीसारख्या संस्थांचा वापर राजकीय हेतुने : मंत्री एकनाथ शिंदे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, कोरोनामुळे अपेक्षेएवढा निधी मिळणार नाही. कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी देऊ.

नगर : केंद्र सरकारकडून ईडीसारख्या संस्थांचा वापर वारंवार केला जात आहे. त्यामुळे या संस्थांवर जनतेचा विश्‍वास राहणार नाही. राजकीय हेतूने अशा संस्थांचा वापर होऊ नये. काही तथ्य आढळले तरच दोषींवर कारवाई व्हावी, असा आरोप राज्याचे नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

नगर जिल्ह्याच्या आढावा बैठकसाठी ते आले होते. या वेळी त्यांनी केंद्रावर आरोप केले. ते म्हणाले, की औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे, अशी जनतेची मागणी आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. जनतेच्या आवाजाबरोबर आम्ही आहोत. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रदेश आहे. त्यांना मानणारी जनता येथे राहते. औरंगजेबबाबत प्रेम असण्याचे काही कारण नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कामांचा प्राधान्य ठरवावा लागेल 

"विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, कोरोनामुळे अपेक्षेएवढा निधी मिळणार नाही. कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी देऊ. राज्यात महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियमावली असल्याने विकासाला खीळ बसत होती. राज्य सरकारने आता एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू केल्याने विकासाला गती मिळणार आहे,'' असे त्यांनी सांगितले. 

नगर महापालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी येथील जागेवर ऍम्युझमेंट पार्क अथवा फिल्म सिटी तयार करण्यासंदर्भात सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

हेही वाचा.. विखे पाटील, थोरातांनी झुंजवायला लावले

युनिफाइड डीसीआरमुळे महापालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी आता विकासकामे करणे सुलभ होणार आहे. याशिवाय, अनावश्‍यक परवानग्या कमी झाल्याने कामाला गती येणार आहे. अनधिकृत बांधकामांना आळा बसणार आहे. शहरातील अनधिकृत जमिनी व बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. अनधिकृत बांधकामे नियमित केले जाणार नाहीत.

हेही वाचा... विवेक कोल्हे यांची तिसरी पिढी जिल्हा बॅकेवर

विकासकामांत राजकारण नको 

"शहराच्या विकासात प्रशासन व लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके असतात. या दोघांनीही समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. हा समन्वय साधला तरच शहराचा विकास होतो. शिवसेनेची राज्यातील अनेक शहरांत सत्ता आहे. तेथे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व नगरसेवकांना बरोबर घेत काम करतात. दुजाभाव करत नाहीत. विकासात राजकारण आणू नका,'' असा सल्ला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिला. 

नगरविकास विभागाच्या नवीन युनिफाइड डीसीआर योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी, तसेच नगर महापालिका व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींमधील समस्या जाणून घेण्यासाठी शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार आशुतोष काळे, लहू कानडे, नीलेश लंके, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उपस्थित होते. 

महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी निधीबाबत दुजाभाव होत असल्याचे सांगत नागरिकांचे प्रश्‍न मांडले. महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी पाच कोटी, सावेडीतील नाट्यगृहासाठी पाच कोटी निधी देण्याचे नगरविकासमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींची रेंगाळलेली कामे आता गतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. "अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना, तसेच भुयारी गटार योजना वेळेत मार्गी लावावी.

ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींनी भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले नाहीत, त्यांनी ते तत्काळ सादर करावेत,' अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख