आगामी महापाैर शिवसेनेचा शक्य ! गडाख यांचा शब्द खरा ठरणार - Upcoming Mahapair Shiv Sena possible! Gadakh's words will come true | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

आगामी महापाैर शिवसेनेचा शक्य ! गडाख यांचा शब्द खरा ठरणार

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

मागील बैठकित गडाख यांनी आगामी महापाैर शिवसेनेचाच होईल, असे सुतोवाच केले आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने घेतलेली माघार हा एक भाग असल्याचे मानले जाते. 

नगर : शहरातील शिवसेनेची विस्कटलेली घडी सुधारण्याचा तसेच राष्ट्रवादीशी असलेले मतभेद मिटविण्याचे काम आता शिवसेनेत नव्याने दाखल झालेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख करीत आहेत. मागील बैठकित गडाख यांनी आगामी महापाैर शिवसेनेचाच होईल, असे सुतोवाच केले आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने घेतलेली माघार हा एक भाग असल्याचे मानले जाते. 

महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांचे संख्याबळ शिवसेनेचे जास्त होते. असे असताना त्यांना महापाैर पक्षाचा करता आला नाही. शहरातील शिवसेनेचे तत्कालिन नेते व राष्ट्रवादीचे नेते यांच्यात मतभेत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार संग्राम जगताप यांनी राजकीय खेळी करीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत महापाैर भाजपचा झाला. या वेळी महापाैर म्हणून बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली. या वेळी जगताप यांच्यावर राष्ट्रवादीतील वरिष्ठही नाराज झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना काही दिवस पक्षातून बाहेर रहावे लागले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळेच सध्या महापालिकेत भाजपची सत्ता असली, तरी अंम्मल मात्र राष्ट्रवादीचाच आहे, असेच मानले जात होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे या पक्षाची युती राज्यभरातील लहान-मोठ्या निवडणुकांतही दिसून आली. याचेच प्रत्यंतर नगरच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीतही दिसून आले.

... तर शिवसेनेचा सभापती झाला असता

महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते समन्वयाने काम करतात. त्यामुळे त्यांच्या आदेशाने नगरमध्येही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेचा नगरसेवक स्थायी समितीचा सभापती होऊ शकला असता. राष्ट्रवादीला भाजपकडून नगरसेवक फोडण्याची गरज काय होती, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला होता. महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला असता, तर गाडे सभापती झाले असते. परंतु राष्ट्रवादीने तसे न करता भाजपचा नगरसेवक फोडून त्याला उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेने माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर स्थायीचे सभापती झाले. प्रत्यक्षात राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा होता, मात्र तसे झाले नाही.

म्हणून आगामी महापाैर शिवसेनेचा शक्य

आगामी काळात शिवसेनेला महापाैरपद मिळावे, यासाठीच आजचे स्थायीचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे देऊन शिवसेनेने खेळी खेळली, असे मानले जाते. स्थायी समितीच्या सभापतीपदाचा विषय थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेला होता. त्यांच्या आदेशानेच शिवसेनेने माघार घेतली. शिवसेनेचे नगरसेवक जास्त असल्याने आगामी काळात महापाैर निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापाैर होईल, असाच अर्थ आजच्या घडामोडीचा होतो. मंत्री गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहरातील शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकित आगामी महापाैर आपला असेल, असे सुतोवाच केले होते. हा त्यांचा शब्द खरा होईल, असेच आजच्या राजकीय घडामोडीचा अर्थ निघतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

रोहिणी शेंडगे यांना महापाैरपद शक्य

महापाैरपद हे अनुसुचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. अशा प्रकारचा उमेदवार शिवसेनेकडे आहे. रोहिणी संजय शेंडगे या शिवसेनेच्या उमेदवार महापाैरपदाच्या दावेदार होऊ शकतात. भाजप व राष्ट्रवादीकडे असा उमेदवारच नाही. त्यामुळे आगामी निवडीत शेंडगे यांनाच संधी मिळू शकेल, असे सांगितले जाते.

 

रोहिणी संजय शेंडगे या अनुसुचित जातीच्या उमेदवार होऊ शकतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख