श्रीगोंद्यातही बिनविरोधचे आवाहन ! वीस लाखांचे बक्षीस देणार - Unopposed appeal in Shrigonda too! Will give a prize of twenty lakhs | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीगोंद्यातही बिनविरोधचे आवाहन ! वीस लाखांचे बक्षीस देणार

संजय आ. काटे
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

येळपणे गटात गट तट व भावकी याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र याचे रूपांतर उदयाच्या काळात भांडणात होऊन गावे दुभंगू नयेत व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.

श्रीगोंदे : गावात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे होणारे गट तट वा छोटे मोठे वादविवाद टाळून संपूर्ण येळपणे गटच तंटामुक्त करण्यासाठी गावची ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् वीस लाख रुपये बक्षिस जिंका, असे आवाहन पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनी केले.

तालुक्याच्या पश्चिमकडील टोकाला असणाऱ्या येळपणे गटात देवदैठण व माठ ही दोन गावे वगळता डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या येळपणे गणातील येळपणे, म्हसे, पिंप्री कोलंदर, उक्कडगाव, ढवळगाव, राजापूर, रायगव्हाण, माठ या आठ गावात तर देवदैठण गणातील हिंगणी दुमाला, गव्हाणेवाडी, येवती, अरणगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, कोरेगव्हाण, सारोळा सोमवंशी, चांभूर्डी, एरंडोली या दहा गावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. 

लोखंडे म्हणाल्या, की येळपणे गटात गट तट व भावकी याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र याचे रूपांतर उदयाच्या काळात भांडणात होऊन गावे दुभंगू नयेत व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.

माजी आमदार राहूल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम शेलार यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास विभागांतर्गत 15 लाख रुपये व क्रिडा मंत्री आदिती तटकरे यांच्या क्रिडा विभागांतर्गत 5 लाख रुपये विकास निधी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला बक्षिस म्हणून देणार असल्याची घोषणा लोखंडे यांनी केली आहे. 

 

हेही वाचा..

... तर कोपरगावचे रुपडे पालटणार 

कोपरगाव : राज्य शासनाने छोटी शहरे मोठी करण्यासाठी व नगरपालीकांचे उत्पन्नाचे स्रोत्र वाढविण्यासाठी तीन मजली इमारती ऐवजी सोळा मजले इमारत बांधण्याची परवानगी जाहीर केली आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात ही परवानगी संगणकावर दिसत नाही. पालिका प्रशासनाने ही परवानगी ऑफलाईन पध्ततीने द्यावयास सुरुवात करावी व शहर विकासातील अडथला दूर करावा, अशी आग्रही मागणी क्रेडाईचे कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केली आहे. 

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना क्रेडाईच्यावतीने अध्यक्ष प्रसाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागण्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष विलास खोंड, सचिव चंद्रकांत कौले ,खजिनदार हिरेन पापडेजा, दिनार कुदळे, राजेश ठोळे, यश लोहाडे, संदीप राहतेकर, सचिन बोरावके, आनंद आजमेरे, मनिष फुलफगर, प्रदिप मुंदडा, राहुल भारती, सिध्देश कपिले, याकुब शेख, जगदीश निळकंठ, किसन आसने, अक्षय जोशी उपस्थितीत होते. मुख्याधिकारी सरोदे यांनीही सकारात्मकपणे याचा विचार करू, असे आश्वासन दिले.

बहुमजली, गगनचुंबी इमारती उभ्या झाल्या तर शहराचे रूप बदलून जाईल. 80 टक्के झोपड्या व टपऱ्या असलेल्या शहरात टुमदार इमारती व मॉल झाले तर कोपरगावकडे इतर शहरवासीयांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून बाजारपेठेतील व्यवसायीक उलाढालींना चालना मिळेल, असे क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख