पारनेर : शिवसेनेच्या वतीने सुमारे 20 लाख रुपये खर्चाचे कोविड सेंटर पारनेरमध्ये उभारले असून, ही शिवसेनेच्या वतीने पारनेरकरांना अनोखी भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्याचे लोकार्पण आज झाले. या वेळी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, युवानेत अनिकेत औटी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, नगराध्यक्षा वर्षा नगरे आदी उपस्थित होते.
या वेळी औटी म्हणाले, की मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने माझ्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी जाहिरातबाजी न करता रक्तदानासह इतर सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून केवळ सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये फक्त पॉझिटिव्ह रूग्णांवरच उपचार केले जाणार आहेत. यासाठी लागणारा खर्च शिवसेना कार्यकर्त्यांनी उचलला आहे. जागतिक महामारीच्या संकटात देशासह जगाला राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदर्श कामगिरीची दखल घ्यावी लागणार आहे. याची इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद होणार आहे. त्यांच्या आवाहनानुसार रक्तदान उपक्रम व 20 लाख रूपयांचे कोविड सेंटर उभारणीसह तसेच एक लाख मास्क व 50 हजार सॅनिटायझरचे वाटपही करण्यात येत आहे.
पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके म्हणाले. की आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे हा उपक्रम हाती घेतला आहे. येथील रूग्णांना पौष्टीक आहारासह आयुर्वेदिक काढा देण्यात येणार आहे. यासाठी आम्ही स्वयंस्पुतीने हा खर्चाचा भार उचलला आहे.
दरम्यान, जिल्ह्याबरोबरच पारनेर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात अशा कोविड सेंटरची गरज पडणार आहे. त्या दृष्टीने सध्या उभारलेल्या सेंटरमध्ये बेडसंख्या अधिक करण्याचे नियोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रसंगानुसार तरतूद करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
Edited By - Murlidhar Karale

