केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज शिर्डीत ! साधणार कार्यकर्त्यांशी संवाद  - Union Minister Ramdas Athavale in Shirdi today! Communicate with the workers | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज शिर्डीत ! साधणार कार्यकर्त्यांशी संवाद 

सतीश वैजापूरकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

विविध समाजघटकांत पक्षाचा विस्तार आणि कार्यकर्ता प्रशिक्षण, अशी आव्हाने त्यांच्या पक्षासमोर आहेत.

शिर्डी : चळवळीतला संघर्ष, ते सत्तेचे सिंहासन, अशी वाटचाल करणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तब्बल तीन वर्षांनंतर रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी ते आज शिर्डीत येत आहेत.

विविध समाजघटकांत पक्षाचा विस्तार आणि कार्यकर्ता प्रशिक्षण, अशी आव्हाने त्यांच्या पक्षासमोर आहेत. 

आठवले यांचे व्यक्तिमत्त्व वलयांकीत आहे. त्यामुळे फारसे प्रयत्न न करता, त्यांच्या पक्षाचा विस्तार मराठवाडा, मुंबई, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रात अन्य गटांच्या तुलनेत वेगाने झाला. ते प्रसारमाध्यमातील लोकप्रिय नेते. त्यामुळे तरुणाई त्यांच्याकडे पटकन आकर्षित होते. स्वाभाविकच त्यांच्यासोबत युती करण्यासाठी कॉंग्रेस व भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष उत्सुक असतात. जनतेचा कौल लक्षात घेऊन आठवले निर्णय घेतात.

आजवर त्यांचे सर्व निर्णय बरोबर ठरले. मात्र, पक्षाचा प्रभाव विखुरलेला असल्याने त्यांनी केलेल्या युतीचा लाभ अन्य मोठ्या पक्षांनाच झाला. त्या तुलनेत त्यांच्या पक्षाला फार मोठा फायदा झाल्याचे दिसत नाही. 

याबाबत राज्य कार्यकारिणी सचिव विजय वाकचौरे म्हणाले, "मंत्री आठवले ज्यांच्यासोबत युती करतात, त्या पक्षाचा अधिक फायदा होतो, हे वास्तव आहे. युतीचा फायदा कार्यकर्ते, पक्ष विस्तारासाठी होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. उद्याच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहोत. शिवाय अन्य समाजघटकांना सोबत घेणे. त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे देखील आवश्‍यक आहे. अन्य समाजघटकात पक्षाचा विस्तार होण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा उभारावी लागेल.'' 

आठवले यांनी तीन वर्षांनंतर सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. शिर्डीनतंर ते मराठवाडा, कोकण व विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सदस्य नोंदणीची तयारी करणार आहेत. पक्षाचे नेते काकासाहेब खंबाळकर, अविनाश महातेकर, श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. या दाैऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिर्डीशी असेही नाते.. 

शिर्डी आणि मंत्री आठवले यांचे नाते फार जुने आहे. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर लढलेल्या लोकसभा निवडणुकीत आठवले यांचा येथून पराभव झाला. मात्र, त्यावर फार टीका-टिपण्णी न करता, त्यांनी शिर्डीवरील आपले प्रेम कायम ठेवले. भीमशक्ती-शिवशक्तीची मुंबईत घोषणा झाली. मात्र, या नव्या युतीचे विवेचन करण्यासाठी त्यांनी शिर्डीची निवड केली. भाजपचे नेते (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, त्यांनी भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, त्या वेळीही त्यांनी शिर्डीतच नव्या भूमिकेची सविस्तर मांडणी केली होती. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख