तुमच्या छातीत उद्धव ठाकरे आणि शरद पवारही : विखेंचा टोला

आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल.तुमची फाडून पाहिली, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो.
vikhe radhakrushna.jpg
vikhe radhakrushna.jpg

नगर : शिवसेनेेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात शिवसेनेेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार विखे पाटील यांच्यावर लिहिलेल्या अग्रलेखातून टीका केली होती. त्याला विखे पाटील यांनी कडक शब्दांत उत्तर दिले आहे. संजय राऊत यांना त्यांनी पाठविलेले पत्र जसेच्या तसे...

श्री संजय राऊत

थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर!

या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे, तर मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली, हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे, असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो, की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय, असा दुटप्पीपणा कोण करतेय, ते ही लपून राहिलेले नाही.

बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून
काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का ? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो, त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल.तुमची फाडून पाहिली, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते, हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा, हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता, हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच.

मी भाजपमध्ये आनंदी आहे, पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करू न शकल्याचे दुःख असेल आणि त्यातून आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल, तर त्यात माझा काय दोष? थोरातांची कमळा असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे. कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती, हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती, तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता. आज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यू-टर्न घेतले, हा इतिहास अनेकांना माहिती आहेच; मी वेगळा काय सांगावा!

आपला,
राधाकृष्ण ए. विखे पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com