सात दुकानांवर कारवाई करीत पारनेरमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू - Two-day public curfew in Parner, taking action against seven shops | Politics Marathi News - Sarkarnama

सात दुकानांवर कारवाई करीत पारनेरमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू

मार्तंड बुचुडे
बुधवार, 9 जून 2021

ही दुकाने सात दिवसांसाठी ‘सील’ करण्यात आली. तालुक्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने बाजारात नागरिकांनी गर्दी करण्यास सुरवात केली आहे.

पारनेर : कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील दुकाने बुधवारी व शनिवारी बंद ठेवून ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय आज (बुधवारी) व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, नियमांचे पालन न करणाऱ्या पारनेर येथील तीन, तर सुपे येथील चार दुकाने सात दिवसांसाठी ‘सील’ करण्यात आली. (Two-day public curfew in Parner, taking action against seven shops)

प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आज व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत व व्यापारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्वच दुकाने दर बुधवारी व शनिवारी बंद ठेवून ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला, अशी माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.

दरम्यान, प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाने पारनेर शहरातील तीन, तसेच सुपे गावातील चार दुकानांवर कोरोना नियम न पाळल्याने कारवाई केली. ही दुकाने सात दिवसांसाठी ‘सील’ करण्यात आली. तालुक्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने बाजारात नागरिकांनी गर्दी करण्यास सुरवात केली आहे. दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. अनेक जण विनामास्क फिरताना आढळल्याने त्यांच्यावर या पथकाने कारवाई केली.

कोरोना संपला नाही

तालुक्यातील लॉकडाउन शिथिल केले असले, तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे जनतेने, तसेच व्यापाऱ्यांनी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- ज्योती देवरे, तहसीलदार

 

हेही वाचा...

एक हजार २७० जणांना दिली दृष्टी; ४८ हजार व्यक्तींचा दृष्टिदानाचा संकल्प

नगर : कोरोनाच्या भीतीने माणूस माणसापासून दुरावत आहे. अशा स्थितीत फिनिक्स सोशल फाउंडेशनने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आधार दिला, तसेच नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून एक हजार २७० दृष्टिहिनांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला.

नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील एका छोट्याशा गावातून, फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळ उदयास आली. जलसंपदा विभागात कार्यरत असताना जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान चळवळीत उत्तुंग कार्य उभे केले. गरजूंसाठी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन ते करीत आहेत. या चळवळीच्या माध्यमातून, महिन्यातून पाच दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबिरे घेतली जातात. कोरोना महामारीतदेखील सर्व नियम पाळून ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिरे घेण्यात आली.

या चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे एक लाख ९३ हजार रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या. नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाने मरणोत्तर नेत्रदानातून एक हजार २७० दृष्टिहिनांच्या जीवनात प्रकाशाची पहाट उगवली आहे. मागील अनेक वर्षांपासून, दर महिन्याच्या १० तारखेला नागरदेवळे येथे शिबिर घेतले जाते. चळवळीच्या माध्यमातून ७८ हजार नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. त्यासाठी गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, राजू बोरुडे, वैभव दानवे, आकाश धाडगे, बाबासाहेब धीवर यांचे नेहमीच सहकार्य लाभते.
 

हेही वाचा...

जिल्हा अनलाॅक असताना या गावांचं ठरलं

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख