श्रीगोंदे : तालुक्यातील भानगाव येथे दोन दिवसांपूर्वी कावळ्यांच्या भांडणात जखमी झालेला व नंतर मरण पावलेला कावळा "बर्ड-फ्लू' पॉझिटिव्ह आढळला आहे. भोपाळ येथील प्रयोगशाळेतून हा अहवाल प्राप्त झाला. शहरातील मृत झालेले एक कबुतर मात्र निगेटिव्ह आले आहे.
दरम्यान, पशुवैद्यकीय विभागाने भानगाव परिसरातील एक किलोमीटर परिसरात फवारणी केली आहे. तसेच तालुक्यातील 160 कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. भानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात दोन कावळ्यांमध्ये तुफान भांडण झाले. त्यात दोघे जखमी झाले; मात्र एक उडून गेला आणि दुसरा जागीच मरण पावला होता. तेथील डॉ. घालमे यांच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती कळवीत, मृत कावळ्याच्या रक्ताची चाचणी करण्यासाठी नमुना पुण्याच्या व तेथून नंतर भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविला.
याबाबत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. गाडे यांनी सांगितले, की भानगाव येथील मृत कावळा व श्रीगोंदे शहरातील मृत कबुतर यांचे नमुने पाठविले होते. त्यांपैकी कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह, तर कबुतराचा निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, भानगाव परिसरातील एक किलोमीटर परिसरात औषधफवारणी करण्यात आली असून, त्या परिसरातील पाचशे कोंबड्यांची सद्यःस्थिती तपासली आहे. तालुक्यातील श्रीगोंदे, काष्टी व बेलवंडी परिसरातील 160 कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. कावळा स्थलांतरित पक्षी असल्याने, कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही डॉ. गाडे यांनी केले आहे.
हेही वाचा..
कांदाउत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले
श्रीरामपूर : तालुक्याच्या विविध भागांत ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे पेरले. मात्र, बदलत्या हवामानामुळे रोपे विरळ झाल्याने, रोपांची पुनर्लागवड करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रारंभी बियाण्याची पेरणी आणि नंतर रोपांची पुनर्लागवड, अशा दुहेरी खर्चामुळे कांदाउत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांसह कांदारोपांना मोठा फटका बसला. यंदा तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडल्याने कांदालागवडीचे क्षेत्र वाढले. प्रारंभी अनेकांनी ट्रॅक्टरच्या साह्याने कांदा बियाण्याची पेरणी केली; परंतु पेरलेले बियाणे ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणात बाद झाले. त्यातच अवकाळी पावसामुळे रोपांची मोठ्या प्रमाणात नासाडीही झाली. यामुळे शिल्लक कांदारोपांची पुनर्लागवड करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. लागवडीचा खर्च वाचविण्यासाठी अनेकांनी प्रारंभी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली; मात्र, अवकाळी पाऊस आणि दाट धुक्यामुळे रोपे विरळ झाली. अनेक भागातील कांदारोपांच्या मुळ्या जळाल्याने पीक धोक्यात आले. त्यामुळे रोपांची पुनर्लागवड केल्याचे तालुक्यातील गोंडेगावसह अनेक भागांत दिसून आले. उत्पादन खर्च वाढल्याने कांदाउत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यात बुरशीजन्य सड रोगाचा प्रादुर्भावही वाढल्याने शेकडो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. दरम्यान, याबाबत महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.
Edited By - Murlidhar Karale

