नगर : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना रोज मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. नगर शहरात महापालिकेकडे एकच शववाहिनी असून, एकाच गाडीत 12 मृतदेह कोंबले असल्याने मृतदेहांची अवहेलना होत असल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापालिकेकडे केली आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्या शवांची अवहेलना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कशा पद्धतीने होत आहे, याचा पोलखोल पुराव्यासह बोराटे यांनी केला आहे.
एकाच शववाहिकेत एक-दोन नव्हे, तर तर आठ कोरोनाग्रस्त आसलेल्या पुरुष आणि चार महिलांचे शव अंत्यविधीसाठी नेले जात असल्याचे फोटो बोराटे त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या संतापजनक प्रकाराने नगर महानगरपालिकेचा कारभार उघडकीस आला आहे. बोराटे यांनी या प्रकारास महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत पत्र लिहले असून, सरकार पातळीवर त्याचा पाठपुरावा करू, प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेची कर वसुलीसह अनेक कामे बंद आहेत. त्यामुळे या विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी मोकळे आहेत. या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना कोरोनासंबंधी कामे द्यावेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांवर वचक राहील, अशी मागणी बोराटे यांनी केली आहे.
केवळ एकच शववाहिका
महानगरपालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी हे निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला असून, एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात महापालिकेकडे केवळ एक शववाहिका आहे, त्यात वाढ करावी, अशी मागणी बोराटे यांनी केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शवांची अवहेलना होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.
दरम्यान, जिल्हाभर कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मृत्यूचे प्रमाण आता शंभरच्या पुढे गेले आहे. कोरोनाने मृत्यू वाढू लागले असून, याबाबत जिल्हा प्रशासनान, आरोग्य विभाग यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोराटे यांनी म्हटले आहे.

