ट्विट वाॅर ! त्या `बालका`चा आभाळाएवढा इगो, तनपुरे यांचा राणेंना टोला - Tweet War! The ego of Tanpure is as big as the sky of that 'child' | Politics Marathi News - Sarkarnama

ट्विट वाॅर ! त्या `बालका`चा आभाळाएवढा इगो, तनपुरे यांचा राणेंना टोला

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 22 मे 2020

परिस्थितीचे गांभीर्य नसलेला एक बालक मात्र स्वतःचा आभाळाएवढा इगो दुखावल्याने दोन दिवसांपासून रडतो आहे.

नगर : ``राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीव ओतून काम करीत आहेत. परंतु परिस्थितीचे गांभीर्य नसलेला एक बालक मात्र स्वतःचा आभाळाएवढा इगो दुखावल्याने दोन दिवसांपासून रडतो आहे,`` अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्विट करून माजी खासदार नीलेश राणे यांचा समाचार घेतला. 

गेल्या आठवड्यापासून राणे व तनपुरे यांच्यात ट्विटवाॅर सुरू आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत ट्विटरवर अपशब्द वापरले होते. राणे व पवार यांच्यात ट्विटवाॅर सुरू असतानाच मंत्री तनपुरे यांनी त्या वादात उडी घेतली. पवार कुटुंबियांबाबत आस्था दाखवत तनपुरे यांनी ट्विटरवरच राणे यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला होता. `पवार टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रमच करतात,` असे ट्विट केल्याने राणे यांचा पारा चढला. `कार्यक्रम` हा शब्द राणे यांना चांगलाच झोंबला. त्यामुळे चिडून त्यांनी तनपुरे यांना उत्तर देताना मात्र असभ्य शब्दांचा वापर केला. त्यामुळे सभ्य कोण किंवा असभ्य कोण, याबाबत ट्विटरवरून जोरदार चर्चा सुरू आहे. असे असतानाच तनपुरे यांनी पुन्हा ट्विट करून राणे यांना उद्देशून बालकाची उपमा दिली आहे.

अपशब्दांचा वापर म्हणजे पराक्रम नव्हे
तनपुरे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, ``राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोरोना विरुद्धच्या लढाईत जीव ओतून कार्य करीत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहे. परिस्थितीचे गांभिर्य नसलेला एक बालक मात्र स्वतःचा आभाळाएवढा इगो दुखावल्यानं दोन दिवस झाले रडतो आहे. अपशब्दांचा वापर केला, की लगान मुलांना वाटतं आपण खूप पराक्रम केला.``  या ट्विटमध्ये राणे यांना लहान बालकाची उपमा दिली आहे.

लगानग्या बालकाला खेळवू नका
दुसऱ्या एका ट्विटमध्ये तनपुरे यांनी आपल्या कार्य़कर्त्यांना सल्ला देत राणे यांना खोचक टोला दिला आहे. ते म्हणतात, ``राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्य़कर्त्यांना माझी विनंती आहे, की आपली कोरोना विरुद्ध मोठी लढाई सुरू आहे. आपला वेळ, आपली ऊर्जा अशा लगानग्या बालकाला खेळविण्यात वाया घालवू नका.``

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख