मृत्यूंची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न, विखे पाटलांना शंका - Trying to cover up the failure by hiding the death statistics, suspects Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

मृत्यूंची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न, विखे पाटलांना शंका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

सरकार आपले अपयश झाकत असले, तरी सत्य उघड झाल्याशिवाय राहत नाही. मृत्यूंच्या आकडेवारीत दिसून आलेली तफावत गंभीर आहे.

नगर : ‘कोरोना संकटातील मृत्यूंची खरी आकडेवारी बाहेर येऊ देऊ नका,’ अशा सूचना राज्यात सर्व जिल्ह्यांमधील प्रशासनाला असाव्यात, अशी शंका भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केली. मृत्यूंची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

आमदार विखे पाटील म्हणाले, ‘‘मृत्यूंची आकडेवारी लपविण्याचा प्रकार हा फक्त मुंबईतच नाही, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये झाला असावा, अशी शंका आता उपस्थित होते. कारण, वस्तुस्थिती समोर येऊ द्यायची नाही, अशा सूचनाच प्रशासनाला दिल्या असाव्यात. यातून सरकार आपले अपयश झाकत असले, तरी सत्य उघड झाल्याशिवाय राहत नाही. मृत्यूंच्या आकडेवारीत दिसून आलेली तफावत गंभीर आहे.’’

‘‘आकडेवारी लपविण्यात वेळ घालवण्यापेक्षा मंत्री व अधिकाऱ्यांनी जनतेला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला असता, तर नागरिकांना दिलासा मिळाला असता. मात्र, मंत्री फक्त बैठकांमधून आढावा घेत बसले. उपाययोजना कोणत्याही झाल्या नाहीत. सरकारकडून रेमडेसिव्हिर अथवा ऑक्सिजनचे कोणतेही व्यवस्थापन होऊ शकले नाही. आघाडी सरकारचे मंत्री आपले अपयश झाकण्यासाठी फक्त केंद्राकडे बोट दाखवीत बसले,’’ अशी टीका आमदार विखे यांनी केली.

 

हेही वाचा...

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करा

नगर : जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. विनामास्क फिरणाऱ्या व कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे संवाद साधला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, ऊर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके स्थापन करून कारवाई करावी.’’ ज्या ठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तत्काळ कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘‘दैनंदिन व्यवहार सुरू झाले असले, तरी दुकाने दिलेल्या वेळेतच सुरू आणि बंद करणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. विशेषतः भाजीविक्री, दूधविक्री, किराणा दुकाने व अन्य आस्थापनांच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे,’’ अशा सूचना त्यांनी दिल्या.
‘‘जिल्ह्यात ‘हिवरेबाजार पॅटर्न’ राबविला जात आहे. नगरपालिका क्षेत्रातही वॉर्डनिहाय पथके स्थापन करावीत. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांची मदत या कामी घ्यावी,’’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. जूनपर्यंत ती पूर्ण व्हावी, यादृष्टीने कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितले. 

 

हेही वाचा..

पारनेरमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यु

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख