बंदिला न जुमानता तृप्ती देसाई शिर्डीत प्रवेश करणार - Trupti Desai will enter Shirdi despite the ban | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

बंदिला न जुमानता तृप्ती देसाई शिर्डीत प्रवेश करणार

मुरलीधर कराळे
बुधवार, 9 डिसेंबर 2020

शिर्डीत साई संस्थानने घेतलेला निर्णय योग्य असून, सर्वांनी योग्य त्या पोषाखातच साईदरबारी येणे आवश्यक असल्याचे मत इतर संघटनांनीही व्यक्त केले आहे.

नगर : शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी सभ्य वेशभूषा करून येण्याच्या संस्थानच्या विनंतीबाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अक्षेप घेतला आहे. त्यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली असली, तरी त्याला न जुमानता त्या उद्या (ता. 10) शिर्डीत प्रवेश करणार आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तृप्ती देसाई यांना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान बंदी घालण्यात आली आहे. विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी संबंधित आदेश दिले आहेत. शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना तशी नोटीसही बजावली आहे.

अशा पद्धतीची नोटीस बजावल्यानंतर इतर संघटनांनीही याला पाठिंबा दिला आहे. शिर्डीत साई संस्थानने घेतलेला निर्णय योग्य असून, सर्वांनी योग्य त्या पोषाखातच साईदरबारी येणे आवश्यक असल्याचे मत इतर संघटनांनीही व्यक्त केले आहे. ब्राम्हण महासंघ, शेतकरी-वारकरी महासंघानेही याला पाठिंबा देत संस्थानने लावलेल्या फलकाचे समर्थन केले आहे. असे असले, तरी या फलकाच्या विरोधात तृप्ती देसाई मात्र ठाम आहेत.

तो फलक हटविण्यावर देसाई ठाम 

दरम्यान, बंदी असूनही तृप्ती देसाई आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्या म्हणाल्या, की नोटीस बजावून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आमचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही. आम्हाला लोकशाहीने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. ज्यांनी चुकीचा बोर्ड लावला आहे, जे भक्तांचं व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेत आहेत, त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही. त्यामुळे एकतर्फी कारवाई करून आमचा आवाज दाबत येणार नाही, असे म्हणत त्यांनी उद्या शिर्डीमध्ये जाऊन तो फलक हटवण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

भाविकांमधूनही स्वागत

भाविकांनी सभ्य वेशभूषेत यावे, या साई संस्थानच्या भूमिकेला भाविकांनी पाठिंबा दिला आहे. बहुतेक भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, पाश्चात्य संस्कृतीचे येथे अनुकरण करू नये, अशीच भूमिका भाविकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे उद्या तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाला भाविकही विरोध करणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या घटनेकडे साईभक्तांचे लक्ष लागले आहे. हे देवस्थान महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक पातळीवर चर्चेचे ठरले आहे. त्यामुळे उद्या तृप्ती देसाई आल्यानंतर देवस्थान काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख