तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात ! शिर्डीतील तो फलक कायम - Trupti Desai in police custody! That panel in Shirdi remains | Politics Marathi News - Sarkarnama

तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात ! शिर्डीतील तो फलक कायम

मुरलीधर कराळे
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

देसाई शिर्डीकडे जाण्यास निघाल्या असता त्यांना सुपे येथे पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. देसाई यांना ताब्यात घेतल्याने शिर्डी येथे फटाके वाजवत त्याचे स्वागत केले.

नगर : शिर्डीतील साई संस्थानने लावलेला सभ्य वेशभूषेबाबतचा फलक हटविण्यासाठी आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शिर्डीकडे येण्यास निघाल्या होत्या. त्यांना सुपे (ता. पारनेर) येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. फलक कायम ठेवल्याने शिर्डीतील नागरिकांनी फटाके वाजवून त्याचे स्वागत केले.

साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी सभ्य वेशभूषेत असावे, अशी अपेक्षा भाविकांची होती. त्यानुसार साई संस्थानने निर्णय घेऊन शिर्डीत फलक लावला. भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाला येताना सभ्य वेशभूषेत यावे, असे विनंतीवजा आवाहन केले. त्यावर देसाई यांनी अक्षेप घेत संबंधित फलकामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, असे सांगत फलक काढण्याचा इशारा दिला. त्यानुसार वाद सुरू झाले. फलक असावा, अशी मागणी काही संघटनांनी केली, तर देसाई यांनी मात्र संबंधित फलक हटविण्यासाठी दहा तारखेला येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिर्डीत काहीसा तणाव निर्माण झाला. 

आज देसाई शिर्डीकडे जाण्यास निघाल्या असता त्यांना सुपे येथे पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. देसाई यांना ताब्यात घेतल्याने शिर्डी येथे फटाके वाजवत त्याचे स्वागत केले. हा फलक असावा, भाविकांनी योग्य त्या पोषाखातच यावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त झाली.

दरम्यान, याबाबत महाराष्ट्रभरातीलच नव्हे, तर इतर देशांतील भाविकांचेहीलक्ष लागले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख