तृप्ती देसाई यांना शिर्डीत येण्यास मनाई - Trupti Desai banned from coming to Shirdi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

तृप्ती देसाई यांना शिर्डीत येण्यास मनाई

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 8 डिसेंबर 2020
कायदा- सुव्यवस्थेस बाधा येऊ नये, यासाठी नऊ ते अकरा डिसेंबरदरम्यान देसाई यांना येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे.

शिर्डी : भाविकांनी सभ्य पोशाख परिधान करून साईसमाधीच्या दर्शनासाठी यावे, अशा आशयाचे साईसंस्थानचे फलक काढून टाकण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना, पुढील दोन दिवस शिर्डीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबतची नोटीस जारी केली.

कायदा- सुव्यवस्थेस बाधा येऊ नये, यासाठी नऊ ते अकरा डिसेंबरदरम्यान देसाई यांना येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. "पोशाखाबाबतचे फलक साईसंस्थानने हटवावेत, अन्यथा गुरुवारी (ता. 10) शिर्डीत येऊन आपण फलक हटवू,' असा इशारा देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला होता. मात्र, "हे फलक पूर्वीपासून आहेत. भाविकांनी केलेल्या विनंती वरून ते लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते हटविण्याचा प्रश्नच येत नाही,' असे साईसंस्थानने पोलिसांना कळविले होते. त्यातच, देसाई शिर्डीत आल्या तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्वाती सुनील परदेशी यांनी दिला होता. या सर्व घडामोडींची दखल घेऊन देसाई यांना येथे येण्यास मनाई करण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी शिंदे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी शिंदे यांनी जारी केलेली नोटीस देसाई यांना बजावल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिली. दरम्यान, याबाबत महाराष्ट्रातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

संस्थानला 15 हजार भाविकांचा पाठिंबा

फलकावरून वाद निर्माण झाल्यावर साईसंस्थानने भाविकांची मते अजमावली. गेल्या चार दिवसांत दर्शनासाठी आलेल्या तब्बल पंधरा हजार भाविकांनी, दर्शनबारीतील अभिप्राय वहीत साईसंस्थानच्या बाजूने कौल दिला, तर 93 भाविकांनी देसाई यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी आज ही माहिती जाहीर केली.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख