कोरोनापासून बचावासाठी मंत्री थोरात यांनी सांगितली ही त्रिसूत्री - This is the trinity that Thorat said to protect from the corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोनापासून बचावासाठी मंत्री थोरात यांनी सांगितली ही त्रिसूत्री

मुरलीधर कराळे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

सणाच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे कोरोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून, अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

नगर : महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात चांगले काम केले. परंतु दिवाळीच्या काळात झालेल्या गर्दीमुळे कोरोना अधिक वाढला आहे. ही बाब चिंताजनक असून, नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क वापरणे, सामाजिक अंतर व हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर आवश्यक आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्या बाबत बोलताना थोरात म्हणाले, की कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. मागील नऊ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात सरकारला चांगले यश आले असून, लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर मात्र वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे. सणाच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे कोरोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून, अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

भारतात दिल्लीमध्येही कोरोनाची मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टनचे पालन करावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसुत्रीचा वापर कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे.

महाविकास आघाडी सरकारने `माझे कुटुंब, माझी जबाबदारी` या योजनेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रात कोरोना रोखण्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र दीपावलीच्या काळात वाढलेली गर्दी पाहता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा घरगुती समारंभ टाळा, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या, शासनाच्या नियमांचे पालन करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख