Tribal starvation caused by three-legged government | Sarkarnama

तीन पायांच्या सरकारने दुजाभाव केल्याने आदिवासी उपासी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करूनही सरकार मदतीची अपेक्षा करीत आहे. इतर राज्यात राज्यसरकारने जनतेसाठी विविध पॅकेज जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली, मात्र महाराष्ट्रात केवळ घोषणा करून त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.

अकोले : ``तीन पायांच्या राज्यसरकारने कोरोना महामारीच्या संकटात योग्य नियोजन न केल्यामुळे सर्वच पातळीवर ते अयशस्वी ठरले आहेत. दुजाभाव केल्याने आज ग्रामीण आदिवासी जनतेला उपासमारीसारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा सरकारचा भाजपच्यावतीने आम्ही काळे मास्क व काळे झेंडे दाखवून निषेध करीत आहोत,`` अशी संतप्त प्रतिक्रिया माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केली.

अकोले तालुक्यात आज ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे या वेळी उपस्थित होते. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल घोषणा देऊन उपस्थितांनी निषेध व्यक्त करून सरकारने जनतेचा भ्रम निराश केल्याचे सांगितले.

या वेळी बोलताना पिचड म्हणाले, ``केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करूनही सरकार मदतीची अपेक्षा करीत आहे. इतर राज्यात राज्यसरकारने जनतेसाठी विविध पॅकेज जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली, मात्र महाराष्ट्रात केवळ घोषणा करून त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. राज्यात १ कोटी ४० लाख आदिवासी असताना केवळ १५ ते २० लाख आदिवासींना खावटी धान्य देण्याचे मान्य केले व दुजाभाव केला. उर्वरित आदिवासींनी काय करायचे, आजही आदिवासी माणूस उपासमारीमुळे जंगलातील कंदमुळे खाऊन दिवस काढीत असल्याचे चित्र आहे. सरकार अजून जागे झाले नाही. आदिवासीच्या उत्पन्नाची साधने थांबली आहेत, शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीमालाला भाव नाही, विकासकामे थांबली आहेत, रोजगार नसल्याने शेतमजूर कष्टकरी उपाशीपोटी राहत आहेत. सरकारने यावर कोणताही ठोस कार्यक्रम राबविला नसल्याने आज कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.``

स्थानिक आमदार काय करतात

पिचड म्हणाले, ``स्थानिक आमदार सोशल मीडियावर फोटो टाकण्यात गुंतले आहेत. आदिवासी माणूस तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. मात्र स्थानिक आमदार व राज्य सरकार याबाबीकडे गांभीर्याने पाहत नसेल, तर कोरोनाबाबत लोक रस्त्यावर उतरतील, तर शेतकरी शेतमजूर तुम्हा ला माफ करणार नाही,`` असेही पिचड म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख