अकोले : आदिवासी समाजाच्या विकासाच्या निधीला कात्री लावून केवळ एक टक्का निधी देणार असाल, तर आदिवासींचा सर्वांगीण विकास कसा होणार, राज्य सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.
राजूर येथील आदिवासी विश्व दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाने संस्था अंतर्गत तसेच राजूर परिसरातील विविध शाळांमध्ये दहावी बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. संस्थेचे सचिव प्रा. एम. एम. भवारी, अध्यक्ष भरत घाणे, प्रा. डॉ. सुनिल घनकुटे, सभापती उर्मिला राऊत,,उपसभापती दत्तात्रय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पिचड म्हणाले, की विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. यामागे शिक्षकांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असे असून, त्यांनी ठरवलेले उद्धिष्ट गाठण्यासाठी परिश्रम आणि मेहनत करावी. लॉक डाऊनच्या काळात सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, मात्र पालकवर्ग गरीब आहे, हाताला काम नाही, रोजंदारी बंद आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे भात शेती धोक्यात आहे, मोबाईलला रेंज नाही, मोबाईल घेण्यास पैसे नाही. मोबाईल घेण्यासाठी पालकांना रक्कम द्या, अशी मागणी त्यांनी केली.
मेटाकुटीला आला असताना त्यांच्या कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे असताना उलट आदिवासी विकास विभागाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकाकरने कपात केली, ही खेदाची बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Edited By - Murlidhar Karale

