नगर : नगर तालुका व श्रोगोंदे तालुक्यातील सुमारे 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी यापूर्वी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, तथापि, अद्यापही या योजनेचा प्रश्न मिटला नाही. अनेक नेते थकले, उपोषणे, आंदोलने झाली, आता या प्रश्नासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या योजनेत लक्ष घालणार आहेत.
साकळाई कृतिसमितीतर्फे साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाबाबत आमदार पवार यांना या समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन आपणच लक्ष घालावे, अशी मागणी नुकतीच केली. ्त्यावर पवार यांनी तीन महिन्यात या योजनेचा पुरेपुर अभ्यास करून निश्चित लक्ष घालू व हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन या कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे ही योजना आता तरी मार्गी लागेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशी आहे साकळाई योजना
या परिसरातील साकळाई नावाच्या डोंगरावरून या योजनेला हे नाव देण्यात आले आहे. कुकडी प्रकल्पातील अतिरिक्त पाण्यावर ही योजना करण्यात आली आहे. नगर व श्रीगोंदे तालुक्यातील 35 गावांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरवठा व्हावा, यासाठी या योजनेचे नियोजन केले. ही योजना पूर्ण झाल्यास सुमारे 18 हजार हेक्टर क्षेत्र नव्याने ओलीताखाली येणार आहे. विसापूर तलावातून विद्युत पंपाद्वारे पाणी उचलायचे व तेथून 11 किलोमीटर दूर असलेल्या साकळाई डोंगरावर ते न्यायचे. तेथून नैसर्गीक उताराने ते नगर तालुक्यातील 17 व श्रीगोंदे तालुक्यातील 18 गावांच्या शेतीला द्यायचे. यासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यात आता आणखीन वाढ झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे.
ण पाण्याच्या उपलब्धतेचे काय
साकळाई योजनेसाठी अनेकांनी राजकारण केले. गेल्या 20 वर्षांपासून या योजनेसाठी नेते राजकारण करीत आहेत. ही योजना कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु कुकडी प्रकल्पातील पाण्यासाठीच गेल्या अनेक वर्षांपासून पुणे व नगर असे वाद सुरू आहेत. अनेकदा दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पुरत नाही. अतिरिक्त पाण्याच्या भरवाश्यावर साकळाई योजनेसाठी पाणी कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी सीना-मेहकरी प्रकल्पासाठीही भोसे खिंडीतून पाणी आणण्यात आले. 2004 मध्ये ही योजना कार्यान्वित झाली. मात्र खूप कमी काळ त्यातून पाणी मिळू शकले. कारण पाणीच उपलब्ध होत नव्हते. सीना धरणातून बीड जिल्ह्यात पाणी घेऊन जाणाऱ्या उपसा सिंचन योजनेचेही काम झाले, मात्र सीना धरणापर्यंतच पाणी येत नसल्याने ते पुढे कसे जायचे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे कुकडी प्रकल्पातील योजनेतील कर्जत आणि करमाळा या तालुक्यांनाच पुरेसे पाणी मिळत नाही. अशीच अपस्था साकळाईचीही होण्याची शक्यता असल्याने कुकडीचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
योजनेविषयी `केवळ गाजरच`
ही योजना करताना कोणावरही अन्याय होणार नाही, म्हणजे कोणाचेही हक्काचे पाणी न घेता ही योजना मार्गी लावली जाईल, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आधीच कुकडीच्या पाण्यासाठी मारामार सुरू आहे. मग साकळाईसाठी पाणी कुठून येणार, हा खरा प्रश्न आहे.
2015 च्या अधिवेशनामध्ये तत्कालीन आमदार राहुल जगताप यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्या वेळी तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले होते की, कुकडी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन पूर्वीच झाले आहे. त्यामुळे आता पाणीच उपलब्ध नसल्याने ही योजना कार्यान्वित करता येणार नाही.
साकळाई योजनेचे आश्वासन देऊन अनेकजण आमदार झाले, तरीही ही योजना पूर्ण करता आली नाही. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनीही अनेकदा आश्वासने दिली. तसेच गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत या योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्याचे सांगून योजनेसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून सर्वच उमेदवारांनी या योजनेचे गाजर दाखविले. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी तर हाच प्रश्न घेऊन विधानसभेचे मनसुबे रचले. आंदोलन करीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठिय्या केला होता. निवडणुका झाल्यानंतर या प्रश्नाबाबत ब्र शब्दही उच्चारला नाही.

