राळेगणसिद्धी : कोरोना संसर्गजन्य रोगाचे संकट असताना सामाजिक अंतर ठेवून राळेगणसिद्धी येथे परंपरागत चालत आलेला सोंगट्यांचा खेळ देवीसमोर खेळून भाविक देवीचा जागर करताना दिसत आहेत. महाभारतात हा खेळ खेळला जात होता.
येथील पद्मावती मातेच्या नवरात्र महोत्सवानिमित्त येथील गावातील ग्रामदैवताच्या मंदिरात पारंपरिक पध्दतीने सोंगट्याचा खेळ खेळला जात आहे. कौरव पांडवांचा खेळ म्हणूनही या खेळास ओळखले जाते. नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण एकत्र येत असून, गेल्या अनेक वर्षांची असलेली परंपरा यानिमित्ताने आजही गावकऱ्यांकडून जपली जात आहे.
या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असून, सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्यांचा वापर होतो. लाकडी सोंगट्या कापडी पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. तर फासे म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो, त्या दानानुसार सोंगटी पटावर पुढे चालवली जाते. हा खेळ दोन गटात खेळवला जात असल्याने ज्या गटाच्या सोंगट्या सारीपाटाच्या मध्यभागी सर्वात प्रथम जातील, तो गट विजयी होतो.
या खेळात एक डाव पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने खेळात अधिक रंजकता निर्माण होत असते. उत्सव म्हणून अनेक वर्षापासून नवरात्र उत्सवात जागर व्हावा म्हणून करमणुकीसाठी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा. मात्र मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या खेळाकडेही पाठ फिरवली आहे.
पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा. मात्र मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या खेळाकडे पाठ फिरवली आहे. आपले पारंपरिक खेळ लोप पावत आहे. आजच्या तरुण पिढीने आधुनिक खेळाबरोबरच या खेळांकडे सुद्धा वळले पाहिजे. आपली परंपरा जपण्यासाठी तरुणांनी हा खेळ समजून घेऊन खेळला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक कांतिलाल औटी यांनी व्यक्त केली. एकनाथ पठारे, कांतीलाल औटी, अर्जुन औटी, सुभाष पठारे, गणेश हजारे, विजय हजारे, ज्ञानदेव कांबळे, विकास कांबळे, करण पठारे, शुभम पठारे, ओंकार कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित असतात.
ल्युडो गेम सारीपाठाचाच आधुनिक अवतार
महाभारतात हा खेळ खेळल्याचे सर्वश्रुत आहे. याच खेळात कौरवांसोबत पांडव हरल्याने पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले होते. सध्याच्या स्मार्ट मोबाइलमध्ये आढळणारा ल्युडो गेम हा या सारीपाटाचाच आधुनिक अवतार म्हणावा लागेल, इतका सारखेपणा त्यात दिसतो. मात्र, हा खेळ जरी सारखा असला तरी समोरासमोर बसून गप्पागोष्टी करत तसेच एकमेकांशी संवाद साधत खेळ खेळण्यात व दुसऱ्यावर मात करण्यात जी मजा आहे, ती मोबाइलमधील गेममध्ये निश्चितच नाही, असे मत सुभाष पठारे यांनी व्यक्त केले.
वर्षातून एकदाच खेळतो
वर्षातून एकदाच आम्ही हा खेळ खेळत असल्याने या खेळाची आवड असलेले गावातील नागरिक मंदिरात दररोज हजेरी लावतात. सध्या कोरोनाचे संकट असले, तरी आम्ही सुरक्षित अंतर ठेवून तसेच सर्व काळजी घेऊन सोंगट्या खेळत देवीचा जागर करतो, असे मत विजय हजारे यांनी व्यक्त केले.
Edited By - Murlidhar Karale

