नगरची वाटचाल "लॉकडाउन'च्या दिशेने - The town is moving in the direction of "lockdown" | Politics Marathi News - Sarkarnama

नगरची वाटचाल "लॉकडाउन'च्या दिशेने

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मार्च 2021

आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 82 हजार 530 झाली असून, बरे झालेले रुग्ण 78 हजार 434 आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 1 हजार 184 लोकांचा बळी घेतला आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी 70 वर आलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने आता पाचशेचा आकडा ओलांडला आहे. आज 456 रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 82 हजार 530 झाली असून, बरे झालेले रुग्ण 78 हजार 434 आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 1 हजार 184 लोकांचा बळी घेतला आहे. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध लादले असले, तरी बहुतेक ठिकाणची लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. बाजारपेठांमध्ये कारवाई केली असली, तरी लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही शहरे लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

हेही वाचा... शेतकऱ्यांना मिळणार या सुविधा 

महापालिकेची स्वॅबसंकलन, लसीकरण केंद्रे 

केडगाव, भोसले आखाडा येथील जिजामाता आरोग्य केंद्र, तोफखाना परिसरातील शितळादेवी मंदिराजवळील आरोग्य केंद्र, माळीवाडा वेशीजवळील आरोग्य केंद्र, सावेडीतील महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्र, मुकुंदनगर येथील आरोग्य केंद्र व नागापूर येथील आरोग्य केंद्र, या सात ठिकाणी महापालिकेतर्फे स्वॅबसंकलन व मोफत लसीकरण सुरू आहे. रोज दीड ते दोन हजार लोक लस घेत आहेत. याशिवाय शहरातील नऊ खासगी दवाखान्यांत 250 रुपयांत कोरोना प्रतिबंधक लस देण्याची सोय करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी दिली. 

हेही वाचा... तेव्हा दिलीप गांधी संतापले होते

महापालिकेची दोन कोरोना सेंटर 

महापालिकेने नटराज हॉटेल येथे 100 बेडचे, तर जैन पितळे बोर्डिंग येथे 70 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. यात जैन पितळे बोर्डिंगमध्ये केवळ महिला रुग्णांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, शहरात "होम आयसोलेशन'चे प्रमाण मोठे असल्याने, या कोविड सेंटरमध्ये सध्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. नटराज हॉटेलमधील केंद्रात दोन, तर जैन पितळे बोर्डिंगमध्ये केवळ एक रुग्ण उपचार घेत आहे. "होम आयसोलेशन'मधील रुग्णांच्या घरांसमोर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सूचना चिकटविण्यात येत आहेत. शिवाय, "होम आयसोलेशन' रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. 

15 मायक्रो कंटेन्मेंट झोन 

* बोल्हेगाव- गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू 
* राघवेंद्र स्वामी नगर परिसर 
* बोल्हेगाव- मनोलीलानगर 
* बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळ्यातील आर्यन अपार्टमेंटमधील "बी' व "सी' विंग 
* सिव्हिल हडको परिसरातील गणेश चौक 
* कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील जयश्री कॉलनी 
* नगर-पुणे रस्त्यावरील माणिकनगर 
* नगर-पुणे रस्त्याजवळील नीलायम हाउसिंग सोसायटीतील लाइन क्रमांक 2 
* सारसनगर- चिपाडे मळा, पावन गणपती मंदिरासमोरील प्रतीक्षा रो-हाउसिंग 
* केडगाव देवी रस्त्यावरील बनकर मळा 
* सावेडी भागातील भिंगारदिवे मळ्याशेजारील प्रेमदान हडको वसाहत 
* सावेडीतील भाग्योदय सोसायटीचे प्रवेशद्वार ते आस्था ब्युटी पार्लर 
* बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळा- भाग्योदय रेसिडेन्सी 
* केडगाव भागातील उदयनराजेनगर 
* केडगाव भागातील अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिराजवळ 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख