नगर : दुग्धविकासमंत्र्यांच्या बैठकित तोडगा निघाला नाही. कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे खवळलेल्या दुध उत्पादक नेत्यांनी तीव्र आंदोलनाची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून उद्या (ता. 1) महाराष्ट्रभर गावागावात चावडीवर दुग्धाभिषेक केला जाईल. चावडीवर जनावरे नेऊन तेथे शासनाचा निषेध करीत निदर्शने केले जाणार आहे.
गेल्या आठवड्यात शेतकरी नेत्यांनी दगडावर दुध ओतून आंदोलन केले. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बैठक बोलावून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. मागण्यांबाबत शासनाने मात्र कोणताही निर्णय दिला नाही. आॅनलाईन बैठकिचा केवळ फार्स केला. त्याच वेळी हे आंदोलन अधिक चिघळणार, हे निश्चत होते.
किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची घोषणाने 1 आॅगस्टपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते डाॅ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदींनी या आंदोलनात पुढाकार घेतला आहे.
असे झाले दुध उत्पादकांचे नुकसान
लॉकडाऊनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला 30 ते 35 रुपये दर मिळत होता. मात्र लॉकडाऊनमुळे दूध मागणी घटल्याने दुधाचे भाव 17 रुपयांपर्यंत खाली कोसळले. शेतकऱ्यांना अशा संकटात मदत व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने प्रति दिन 10 लाख लिटर दुध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे किमान 25 रुपये दराची हमी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही योजना केवळ सहकारी दूध संघांनाच लागू करण्यात आली. राज्यातील 76 टक्के दूध संकलित करणाऱ्या खासगी दूध कंपन्यांना यातून वगळण्यात आले. परिणामी सरकार प्रतिदिन 10 लाख लिटर दूध खरेदी करू शकले नाही. शेतकऱ्यांना यामुळे पुरेसा दिलासा मिळाला नाही. योजना सुरू असतानाही दुधाचे खरेदी दर यामुळे 17 रुपयांपर्यंत खाली आले.
या आहेत मागण्या
- दुधाला प्रतिलिटर कमान 30 रुपये दर मिळावा.
- प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावेत.
- दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा
- जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा.
- देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान 50 रुपये अनुदान द्यावे.
महाराष्ट्रातील बहुतेक गावांत आंदोलन : डाॅ. नवले
महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या गावांमध्ये उद्या आंदोलन केले जाणार आहे. चावडीवर दूध ओतून तेथे जनावरे बांधली जातील. तसेच सरकारच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने केले जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत हे आंदोलने होतील, असे शेतकरी नेते डाॅ. अजित नवले यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

