Today's birthday: MLA Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार राधाकृष्ण विखे पाटील

मुरलीधर कराळे
सोमवार, 15 जून 2020

वडिल व आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार विखे पाटील यांनी आपली कारकीर्द गाजविली. बालपणापासूनच मिळालेले राजकारणाचे बाळकडू, संस्काराची शिदोरी त्यांच्या कामातून दिसून येते.

नगर : शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. शिर्डी मतदारसंघ तसेच राहाता तालुका शैक्षणिक, आैद्योगिक, पर्यटकीय दृष्ट्या सुजलाम सुफलाम करण्यामागे विखे पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांची भूमिका कायम महत्त्वाची राहिली आहे.

आमदार विखे पाटील यांचा जन्म 15 जून 1959 रोजी झाला. विखे कुटुंबिय राजकीय घराणे. आशिया खंडातील पहिला सहकारी  साखर कारखाना सुरू करणाऱ्या कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाजकारण, राजकारणाची धुरा त्यांचे चिरंजीव माजी खासदार कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी चालविली. वडिल व आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार विखे पाटील यांनी आपली कारकीर्द गाजविली. बालपणापासूनच मिळालेले राजकारणाचे बाळकडू, संस्काराची शिदोरी त्यांच्या कामातून दिसून येते. आजोबांनी स्थापन केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू झाले. त्या वेळी आमदार विखे पाटील यांचा पहिलीत प्रवेश झाला. आजोबांच्या आग्रहास्तव त्यांना वसतीगृहात ठेवण्यात आले. वसतिगृहात सर्वसामान्य मुलांसोबत राहणे किती खडतर असते, हे त्यांनी अनुभवले. या जीवनाची जाणीव व्हावी, सर्वसामान्य मुलांचे प्रश्न समजावेत. लहानपणापासूनच प्रश्नांना तोंड देण्याचे बाळकडू त्यांना खऱ्या अर्थाने अनुभवातून शिक्षण मिळावे, हाच आजोबांचा उद्देश होता. पब्लिकस्कूलमध्ये अकरावीपर्य़ंत शिक्षणात त्यांनी भगवदगीतेच्या श्लोकाचे पाठांतर झाले. विविध कार्यक्रमांतून यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या विचारांचे संस्कार विखे पाटील यांच्यावर याच काळात झाले.

सातवीत असतानाच भारत-पाकिस्तान युद्धाच्या बातम्या रेडिओवरून एेकायला मिळायच्या. गरजुंना मदतीचे अवाहन त्यामध्ये असायचे. त्यामुळे त्यांनी बांग्लादेशी निर्वासितांसाठी कपड्यांची मदत पाठविली होती. अकरावीनंतर धुळे, कोल्पापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना आमदार विखे पाटील यांच्यावर सामाजिक कार्याचे बिजारोपण झाले. कोल्पाहूरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संप केला होता. कोल्हापूरमधील प्रसिद्ध बिंदू चाैकात त्यांनी केलेले भाषण अजूनही समकालीन लोकांच्या स्मरणात आहेत. 

राजकीय जीवनाची सुरूवात होत असतानाच आमदार विखे पाटील यांच्यावर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या श्रीरामपूर येथील जाहीर सभेचे नियोजन करण्याची जबाबदारी पडली. अर्थात ही संधी त्यांनी सोडली नाही. स्वयंसेवक म्हणून काम करताना लाठ्यांचा प्रसादही त्यांना खावा लागला. 1986 मध्ये युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषविताना त्यांनी युवकांसाठी अनेक उपक्रम राबविले. भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली. 1988 मध्ये त्यांनी नगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनालय सुरू करून सामाजिक कार्याची चुनूक दाखवून दिली.

1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली आमदारकीची निवडणूक लढविली. त्यांनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. या मतदारसंघाचे विधानसभेचे सदस्यत्त्व ते आजपर्यंत भक्कमपणे करीत आहेत. थोड्याच दिवसात वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आमदार विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देवून पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी केली. आणि ते पुन्हा निवडून आले. आमदार झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून ते कायम या मतदारसंघाचे हिरो ठरले.

आमदार विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखाना, मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्था, प्रवरा बॅंक, प्रवरा फळे व भाजीपाला उत्पादक संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा ग्रामीण नैसर्गिक-सामाजिक अध्ययन संस्था, साईबाबा संस्थान आदींच्या विविध पदांवर काम करताना उल्लेखनीय काम केले. रशिया, चिन, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स, अशा अनेक देशांचे दाैरे करून शेतकऱ्यांसाठी, नवीन शिक्षणाबाबत अनेक तंत्रज्ञान आणले. राज्याचे कृषी व पणनमंत्री असताना त्यांनी केलेली कामे राज्याच्या स्मरणात आहेत.

काॅंग्रेसमध्ये असताना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद त्यांना मिळाले. या काळात त्यांनी भाजपवर अनेक प्रश्नांवर टीका केली. परंतु ती अत्यंत अभ्यासूपणे मांडली. केवळ आक्रमक न होता, त्यात अभ्यासूपणा दिसून येत होता. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपवासी झाले. सध्या महाआघाडीच्या सरकारच्या काळात त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले असले, तरी सरकारच्या चूका दाखवून देत ते महत्त्वाच्या प्रश्नांवर महाआघाडीतील नेत्यांची बोलती बंद करीत आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख