नगर जिल्ह्यात तपासण्यांना वेग, आज आढळले 757 कोरोना रुग्ण - today found 757 corona patients | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात तपासण्यांना वेग, आज आढळले 757 कोरोना रुग्ण

मुरलीधर कराळे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

जास्तीत जास्त रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करून कोरोनाला आळा बसू शकेल, असे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

नगर : कोरोनाला लवकर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तपासण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यात 757 रुग्ण आढळून आले आहेत. जास्तीत जास्त रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करून कोरोनाला आळा बसू शकेल, असे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कोरोना टेस्ट लॅब ४८, अॅंटिजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खासगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधीत आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब आणि अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ४५ हजार १७२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 4 हजार 965 रुग्ण बरे झाले असून, सध्या 2 हजार 976 रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 94 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 8 हजार 35 झाली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती असून, त्यावर नियंत्रण करण्यात येत आहे. मास्क न लावणे किंवा कोविडच्या नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 

प्रशासनाकडून कारवाई होत असली, तरी नागरिक मात्र गर्दी करताना दिसत आहेत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी होत आहे. नगरच्या मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत असून, अनेक ठिकाणी सामाजिक अंतर पाळण्याचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

नगर शहराबरोबरच संगमनेर भागात रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अॅटिजेन चाचण्या वाढविण्यात आल्या असल्याने रुग्ण संख्याही जास्त दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत असून, वाढलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी कोविड सेंटर वाढविण्याची गरज पडणार आहे. असे असले, तरी जिल्ह्यात कोविड सेंटर वाढविण्यात आले असून, आढळलेल्या रुग्णांवर प्रशासनाच्या वतीने उपचार करणे शक्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख