Today the death of a woman who gave birth to 9 infected, twins | Sarkarnama

कोरोनाचा कहर ! आज 9 बाधित, जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या महिलेचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 मे 2020

ही महिला चेंबूर येथून निंबळकला आली होती. तिला त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाविषयी चाचणी घेतल्यानंतर तिचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर काल तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

नगर : निंबळक येथील कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या आणि काल दोन जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. दरम्यान, आज आलेल्या अहवालात नऊजण पाॅझिटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

ही महिला चेंबूर येथून निंबळकला आली होती. तिला त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाविषयी चाचणी घेतल्यानंतर तिचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर काल तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. ही मुले सुखरुप असले, तरी महिलेची तब्येत मात्र बिघडत होती. तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आज सकाळी तिचा मृत्यू झाला.

आज जिल्ह्यात ९ नवीन रुग्ण

आज सकाळी आलेल्या 60 कोरोना अहवालापैकी नऊ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले १, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४. अशा व्यक्तिंचा समावेश आहे.

बाधीत रुग्णामध्ये ४ पुरुष, ४ महिला आणि ४ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. निमगाव येथील व्यक्ती यापूर्वीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहे. बाधीत रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश. संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते. दुसऱ्या ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयाने पाठवले होते. घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे. चाकण येथून ढोर जळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवक बाधीत झाला आहे.

बाजारपेठ सुरू, पण धास्ती कायम

दरम्यान, नगर जिल्ह्यात सध्या बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. नगर शहरात तर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे शक्य होत नाही. बाजारपेठा सुरू झाल्या असल्या, तरी कोरोना वाढण्याची भिती मात्र कायम आहे. तोंडाला मास्क लावणे प्रशासनाने सक्तीचे केले आहे. मात्र बहुतेक लोक हा नियम पाळताना दिसत नाही. नगर जिल्ह्यातील लोक कोरोनाबाधितांमध्ये जास्त आढळत नाहीत. मुंबई, पुणे येथून आलेले कोरोनाग्रस्त असल्याचे दिसून येत असले, तरी त्याची लागण स्थानिकांना होऊन हा आजार फैलावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बाजारपेठा सुरू झाल्याची लोकांना खुषी असली, तरी कोरोना फैलावण्याची भितीही आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख