आमदार राजळे यांच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांवर `बोंबाबोंब`ची वेळ - Time for 'bombing' on BJP workers in MLA Rajale's constituency | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार राजळे यांच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांवर `बोंबाबोंब`ची वेळ

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

आम आदमी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत "बोंबाबोंब' आंदोलन करून नागरी सुविधा पुरविण्याची मागणी केली.

पाथर्डी : पैठणच्या जायकवाडीतून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे पाच दिवसांपासून शहरासह चौदा गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासाठी नागरिकांनी आज पालिकेत "बोंबाबोंब' आंदोलन केले. विशेष म्हणजे पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे या भाजपच्या असतानाही भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

 

आम आदमी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत "बोंबाबोंब' आंदोलन करून नागरी सुविधा पुरविण्याची मागणी केली. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. पैठणच्या जायकवाडी पाणीयोजनेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे मंगळवारी खंडित केला होता. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी व चौदा गावे योजनेचे पाणी बंद केले होते.

हेही वाचा... जिल्ह्यातील सेवा संस्था होणार डिजिटल

काही भागांत आठ दिवसांपासून पाणी मिळालेले नाही. ही योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अन्य कोणताही पर्याय पालिकेकडे नाही. पालिकेची स्वतःची योजनाच अस्तित्वात नाही. किसन आव्हाड, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, सुनील पाखरे, नागनाथ गर्जे, दिनकर पालवे, अशोक ढाकणे, शाबीर शेख, नवाब शेख यांनी आज (शुक्रवारी) पालिकेत "बोंबाबोंब' आंदोलन केले. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी, पाणीपुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल, असे सांगितले. 

थकबाकी भरली, उद्या येणार पाणी

पाथर्डी, शेवगावसह चौदा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेची दीड कोटीची थकबाकी जिल्हा परिषदेकडे भरल्यामुळे योजनेचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. उद्यापासून (शनिवार) नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, असे प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी सांगितले.

हेही वाचा... अर्सेनिकची परिणामकारकता संशयाच्या भोवऱ्यात

हेही वाचा...

तीन पाणीपुरवठा योजना बंद 

शेवगाव : जायकवाडीतून शेवगाव तालुक्‍यातील गावांना चार योजनांद्वारे पाणीपुरवठा होतो. या योजनांची वीजबिल थकबाकी सहा कोटी 62 लाखांच्या घरात गेल्याने, महावितरणने वीजपुरवठा तोडला. त्यामुळे चारपैकी तीन पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.

संबंधित ग्रामपंचायती व नगरपालिकांना त्याचे घेणे-देणे नसल्याने, नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. 

महावितरणच्या पथकाने थकबाकीचे कारण पुढे करीत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. 16) सायंकाळी चारच्या सुमारास शेवगाव-पाथर्डी व 54 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या, दहिफळ येथील जॅकवेल, खंडोबामाळ, अमरापूर पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. या योजनेची दोन कोटी 49 लाख सात हजार रुपये थकबाकी आहे. 

शहरटाकळी व 24 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना ज्ञानेश्‍वर संयुक्त पाणीपुरवठा समिती चालविते. या योजनेच्या, कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची थकबाकी एक कोटी आठ लाख रुपये (मागील) व 34 लाख 92 हजार रुपये (चालू) आहे. हातगाव व 28 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. योजनेचे काम अपूर्ण असल्याने, कांबी व हातगावसह फक्त 12 गावांना अधूनमधून पाणीपुरवठा होतो. या योजनेच्या, कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची मिळून थकबाकी 1 कोटी 73 लाख रुपये आहे, तर 77 लाख 52 हजार रुपये चालू बाकी आहे. 

बोधेगाव व सात गावे ही योजना संबंधित ग्रामपंचायतींतील सदस्यांच्या समितीमार्फत चालविली जाते. तिचे अध्यक्ष बोधेगावचे उपसरपंच नितीन काकडे आहेत. या योजनेच्या, कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व सोनेसांगवी येथील पंपहाऊसची थकबाकी 1 कोटी 13 लाख रुपये, तर चालू बाकी 38 लाख 88 हजार रुपये आहे. या योजनेची वार्षिक वसुली 17 लाख आहे. मात्र, या वर्षी फक्त 13 लाख 500 रुपये वसुली झाली. 

शेवगाव-पाथर्डी योजनेची थकबाकी 

शेवगाव नगरपालिका- 2 कोटी 80 लाख 60 हजार 815 रुपये, पाथर्डी नगरपालिका- 87 लाख 28 हजार 335 रुपये, शेवगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायती- एक कोटी 87 लाख 66 हजार 456 रुपये, पाथर्डी तालुक्‍यातील ग्रामपंचायती- एक कोटी नऊ लाख 94 हजार 990 रुपये. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख