अकोले : रोज सकाळी हरब भाजी घेऊन राजूर येथे येणारी शीतल भांगरे ही महिला सकाळी साडेसहा वाजता घरातून (आंबेदरा) येथून निघाली खरी, मात्र पुढे मृत्यू ओढवून ठेवल्याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती.
घरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर टनटनीच्या बनातून जात असताना समोरून पट्टेरी वाघ व एका झुडपतून बिबट्या येताना तिला दिसताच हातातील भाजीचे गाठोडे फेकून देत ती हिरकणी झुडपाच्या रस्त्याने जीव मुठीत घेऊन धावली
पळत-पळत थेट घराच्या अंगणात पोहचली व आपला जीव वाचवला. पायाच्या तळव्याला झालेल्या जखमा व अंगातून सुटलेला घाम पाहून घरचे मालक संजय भांगरे व मुलेही घाबरली.
दोन दिवसांनी शीतल संजय भांगरे (वय ३५) ही राजूरच्या बाजारात हरबरा भाजी घेऊन आली असता तिने संवाद साधला. तिने घडलेली घटना सांगतली. मात्र आजही या वाघाने आंबेदरा, साकीर वाडी, माणिक ओझर, गोंदुशी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, सह्याद्रीच्या पायथ्याशी ही गावे असल्याने डोंगरावर व दाट झाडीत लपण्यासाठी मुबलक जागा मिळाली.
वाघीण व्याली असून, तिला तीन बछडे झाली आहेत. यापूर्वी अंजनाबाई भोईर यांनी आपला जीव वाचवला, तर गावात वाघाने जनावरे व माणसांवर चाल करून नुकसान करण्याचा सपाटा सुरू केला आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माणिक ओझर येथील चिंधू सखाराम बोटेयाच्या २ शेळ्या, दिनकर कदम बोकड, तर रामनाथ धराडे याची कालवड जखमी केली. तर अंबेदरा येथील शरद भीमा भांगरे यांची पारडी जखमी केल्याने आज परिसरात मोठी घबराट सुरू झाली आहे.
दोन दिवसापूर्वी किसन भोईर व भाऊराव गंभीरे हे दूध घेऊन येत असताना खळ्यात सकाळी सात वाजता वाघ बसल्याने ही दोघे दूध टाकून जीव मुठीत घेऊन पळाले. वन विभागाने या परिसरात पिंजरा लावावा, वाघ रोज बांगर वाडीत येऊन डरकाळ्या फोडतो, त्यामुळे सायंकाळी सातनंतर घरात बसावे लागते, तर सकाळी सात वाजता तो रस्त्यावर थांबून असतो, त्यामुळे या भागातील आदिवासींना जीव मुठीत धरून आपले जीवन कंठावे लागत असल्याचे उपसरपंच सुरेश भांगरे यांनी सांगितले.
दरम्यान, अकोले तालुक्यात आता वाघ व त्याची तिन बछडे दिसू लागले आहेत. बिबट्याचा उपद्रव तर कायमच आहे. याबाबत आमदार डाॅ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांनी लक्ष घालून आदिवासींचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले होते आहेत.
Edited By - Murlidhar Karale

