लंके, औटी अन त्या नगरसेवकांसमवेत कोरेगावकर यांच्याशी तीन बैठका ! पण मनोमिलनाचे काय? - Three meetings with Koregaonkar along with Lanka, Auti and those corporators! But what about mindfulness? | Politics Marathi News - Sarkarnama

लंके, औटी अन त्या नगरसेवकांसमवेत कोरेगावकर यांच्याशी तीन बैठका ! पण मनोमिलनाचे काय?

मार्तंड बुचुडे
बुधवार, 15 जुलै 2020

पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या त्या पाच नगरसेवकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर पुन्हा घरवापशी झाली. त्या पार्श्वभूमीवर आज कोरेगावकर पारनेरमध्ये दाखल झाले.

पारनेर : शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी पारनेमध्ये आज तीन बैठका घेतल्या. पहिली माजी आमदार विजय औटी यांच्यासमवेत झाली. दुसरी शिवसेनेत परतलेल्या त्या पाच नगरसेवकांसमवेत व तिसरी बैठक राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व त्या पाच नगरसेवकांसमवेत झाली. या बैठका घेवूनही त्या पाच जणांचे मनोमिलन झाले का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला.

पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या त्या पाच नगरसेवकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर पुन्हा घरवापशी झाली. त्या पार्श्वभूमीवर आज कोरेगावकर पारनेरमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रथम औटी यांची भेट घेतली. नंतर आमदार लंके यांच्यासह  त्या पाच नगरसेवकांची एकत्रीत बैठक झाली. बैठक झाली, मात्र यातून खरोखच हे नगरसेवक शिवसेनेत मनाने येणार का व औटी आणि लंके हे कितपत जुळवून घेणार, याची मात्र तालुक्यात अता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेत पुन्हा आलेले नगरसेवक मुंबई येथून ठाकरे यांना भेटून आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच वेळी कोरेगावकर त्यांच्या पक्ष स्वागतासाठी पारनेरला येणार होते, मात्र त्यांना क्वारंटाईन केल्याने कोरेगावकरांचा पारनेर दौरा लांबला होता. तो आज झाला. या वेळी त्यांना क्वारंटाईन करण्यात माजी आमदार औटी यांचा हात होता, असा आरोपही या पाच नगरसेवकांनी केला होता. 

कोरेगावकर यांनी पारनेरमध्ये आल्यानंतर प्रथम औटी यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली, मात्र त्या बैठकीचा तपशील संगण्यास त्यांनी नकार दिला. त्याबाबत मी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले. गेली 15 वर्ष औटी आमदार आहेत, त्यामुळे पारनेरमध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

कोरेगाव म्हणाले, की मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आदेश मानणारा शिवसैनिक आहे. दोन्ही पक्षामधील कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडविण्याचा प्रयत्न आहे, मात्र याचा अर्थ शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जाईल, असे मात्र मी होऊ देणार नाही, असेही कोरेगावकर स्पष्ट केले.

पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले व त्यानंतर राज्यात आघाडी असल्याने आघाडीचा धर्म म्हणून त्या नगर सेवकांची पुन्हा घरवापसी करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना व राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर कोरगावकर यांनी या पक्ष नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मी केवळ शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी आलो आहे. नाराज नगरसेवक व शिवसैनिक यांच्यात मनोमिलन झाले पाहजे, ही माझी अपेक्षा आहे, असे कोरेगावकर यांनी सांगितले.

आमदार लंके व कोरेगावकर यांच्या बैठकीप्रसंगी ते पाच नगरसेवक यांची ही एकत्रीत बैठक झाली, त्यामुळे आता नेमके हे नगरसेवक काय भूमिका भविष्यात घेणार, हे मात्र काळच ठरविणार आहे.

आम्ही शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार

भविष्यात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच आदेश मानणार आहोत. आमचा खरा प्रश्न होता, तो शहराचा. पाणी प्रश्न तो सोडविण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. तो प्रश्न ठाकरे सोडविणार आहे. आमचा स्थानिक नतृत्वावर राग होता. आता आम्ही शिवसेनावाढीसाठी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया नगरसेवक किसन गंधाडे यांनी व्यक्त केली.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख