Three in the city, one positive for Rashin | Sarkarnama

आता नगरची धुलाई ! शहरात तीन, राशीनचा एक पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 मे 2020

रामचंद्रखुंटावरील वृद्धेचा आज कोरोनाने बळी घेतला, ही धास्ती नगरकरांना होती. ही बातमी शिळी होत नाही तोच रात्री उशिरा आलेल्या अहवालाने आता नगरकरांची झोपच उडाली आहे.

नगर : कोरोनाने शहरात पाय रोवल्यानंतर आता धुलाईच करायचे ठरविलेले दिसते. आज रात्री उशिरा आलेल्या अहवालात रिक्षाचालकाच्या संपर्कातील तिघे, तर राशीनमध्ये क्वारंटाईन केलेल्या मुंबईच्या महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. आज रात्री चार जण पाॅझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णाने पंचाहत्तरी गाठली आहे.

रात्री उशिरा आलेल्या अहवालातील चार अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जुना मंगळवार बाजारातील रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या शिवाय कर्जत तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मुळच्या मुंबई येथील 75 वर्षीय महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी केवळ संगमनेर व जामखेडमध्ये रुग्णांची संख्या जास्त होती. तसेच शहरातील आलमगीर व मुकुंदनगर परिसरात रुग्ण सापडले. ते आता बरे होऊन घरी गेल्याने नगर शहरावरील संकट टळले असे वाटत होते. मात्र झेंडीगेट परिसरातील महिला पाॅझिटिव्ह आढळल्याने कोरोनाने खऱ्या अर्थाने नगर शहरात पाय ठेवला. त्यानंतर सारसनगरमध्ये वाहनचालक पाॅझिटिव्ह निघाला. त्यांच्या नात्यातील लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मात्र कोरोनाने शहरात पाय पसरायला सुरुवात केल्याचे संकेत येवू लागले. जुना बाजारातील रिक्षावाला पाॅझिटिव्ह आढळल्याने तो किती जणांना `प्रसाद` देणार, याबाबत साशंकता होती. रामचंद्रखुंटावरील वृद्धेचा आज कोरोनाने बळी घेतला, ही धास्ती नगरकरांना होती. ही बातमी शिळी होत नाही तोच रात्री उशिरा आलेल्या अहवालाने आता नगरकरांची झोपच उडाली आहे. रात्री आलेल्या अहवालात रिक्षाचालकाच्या संबंधातील तीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राशीन येथे मुंबईहून आलेल्या एका महिलेचा अहवाल आले असून, ती कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले.

नगर धोकादायक वळणावर

आज मृत्यू पावलेली वृद्धा एका नगरसेवकाची नातेवाईक असल्याचे समजते. तसेच तिला भेटण्यासाठी शहरातील काही नगरसेवक गेले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता किती जणांना त्याची बाधा झाली असेल, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार काही लोकांची तपासणी करण्यात आली, तथापि, त्या रिक्षात अजून किती जणांनी प्रवास केला, किंवा त्याच्या संपर्कात अजून किती लोक आले, हेही लवकरच स्पष्ट होणार असल्याने नगर धोकादायक वळणावर आल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात रोज रुग्णांची भर पडत आहे. शेजारी पुणे व औरंगाबाद शहरही कोरोनाने त्रस्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत, तरीही कोरोनाचा आकडा वाढतच आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख